धुळे : शरद पवार यांच्यासमोरचं अनिल गोटे यांनी वाचला पक्षातील गटबाजीचा पाढा

अनिल गोटे
अनिल गोटे
Published on
Updated on

धुळे, पुढारी वृत्तसेवा : धुळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटन आणखी मजबूत करण्यासाठी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या समोरच माजी आमदार अनिल गोटे यांनी पक्षाची गटबाजी मांडली. गटबाजी करणारे पदाधिकारी जिल्ह्यात पक्ष वाढवण्या ऐवजी राज्यस्तरावर केवळ तक्रारी करण्यासाठी आपल्या पदाचा वापर करीत असल्याचा गंभीर आरोप देखील गोटे यांनी केला. अशा खेकडा वृत्ती असणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी देखील त्यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या वर्षभरापासून गटबाजी सुरू आहे. खानदेशात राष्ट्रवादीची शक्ती वाढावी यासाठी पक्षाच्या नेतृत्वाने माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या पाठोपाठ धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे यांना पक्षात प्रवेश दिला. माजी आमदार अनिल गोटे हे त्यांच्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखले जातात. राष्ट्रवादीमध्ये प्रवेश घेतल्यानंतर त्यांनी शिंदखेडा मतदारसंघाचे आमदार जयकुमार रावल यांच्या विरोधात मोहीम उघडली. यासाठी शिंदखेडा तालुक्यातील गावांमध्ये त्यांनी कोपरा बैठका घेऊन पक्षाची ध्येयधोरणे मांडत असतानाच जयकुमार रावल यांच्यावर टीकेची तोफ डागली. पण धुळे शहर विधानसभा मतदारसंघात मात्र राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि माजी आमदार अनिल गोटे यांचे दोन स्वतंत्र गट उघड उघड पडले. त्याचे प्रदर्शन आज राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या समोर खुद्द माजी आमदार अनिल गोटे यांनी त्यांच्या प्रास्ताविकात मांडले.

गेल्या 62 दिवसांपासून धुळ्यात असणाऱ्या राष्ट्रवादी भवनाच्या दुरुस्तीचे काम माजी आमदार अनिल गोटे यांनी हातात घेतले. यासाठी त्यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यांना मदतीचे आवाहन केले. या मदतीच्या आधारावरच त्यांनी राष्ट्रवादी भवनाचे सुशोभीकरण केले. या सुशोभीकरणा नंतर आज पक्षाचे नेते शरद पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादी भवनाचे अनावरण झाले. यावेळी प्रास्ताविकात नूतनीकरणासाठी मदत करणाऱ्यांची यादीच माजी आमदार अनिल गोटे यांनी पक्षाचे नेते शरद पवार यांना सोपवली. या मदतीच्या नावांमध्ये धुळे शहरातील विद्यमान पदाधिकाऱ्यांची नावेच नसल्याचे देखील सांगितले जाते आहे. यावेळी बोलत असताना गोटे यांनी पक्षात गटबाजी केली जात असल्याचे उघड सांगितले. आज होणाऱ्या कार्यक्रमासाठी धुळे शहरात वेगवेगळ्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी फलक लावले. हे फलक पाहून एवढे कार्यकर्ते पक्षात असताना त्यांनी राष्ट्रवादी भवनाकडे पाठ फिरवल्याचे निदर्शनास आणून दिले. त्याचप्रमाणे धुळ्यात पक्ष वाढीवर लक्ष देणे ऐवजी राज्याच्या नेत्यांकडे तक्रारीचा पाढा वाचून गटबाजी अधिक मजबूत करणाऱ्यांवर देखील त्यांनी पवार यांच्यासमोरच टीकेची तोफ डागली.

धुळे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचे काम आपण प्रामाणिकपणे करत आहोत. यासाठी दहा हजार कार्यकर्त्यांची नोंदणी केली  अजूनही गावपातळीपर्यंत काम नेणार असल्याने भविष्यात तीन विधानसभा जिंकण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवल्याचे त्यांनी सांगितले. मात्र यासाठी पक्षातील खेकडा वृत्ती नष्ट करण्याची विनंती पक्षाचे नेते शरद पवार यांच्याकडे केली. हाच धागा पकडून आमदार एकनाथराव खडसे यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गटबाजी करणाऱ्यांचे कान उपटले. तर पक्षाचे नेते शरद पवार यांनी देखील त्यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रवादीचा कार्यकर्ता हा जनतेच्या संकटात सर्वात आधी धावून आला पाहिजे. यासाठी जनतेच्या मनात विश्वास जागा करणारा कार्यकर्ता असावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news