Dhule Bribe | ‘त्या’ लाचखोर पोलीस निरीक्षकासह दोन कर्मचाऱ्यांना पोलिस कोठडी, व्हाईस सॅम्पल घेणार

File Photo
File Photo

धुळे पुढारी वृत्तसेवा-प्रतिबंधात्मक कारवाई टाळण्यासाठी दीड लाखाची लाच स्वीकारल्या प्रकरणात धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्यासह पोलीस कर्मचारी नितीन मोहने आणि अशोक पाटील यांना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान या प्रकरणात व्हाईस सॅम्पल घेणे बाकी असून घर झडतीमध्ये दागिने आणि मोठ्या रकमा मिळालेल्या असल्यामुळे त्याचा हिशेब घेण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कोठडीची मागणी केली होती, ती मागणी न्यायालयाने मंजूर केली आहे. मात्र लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सादर केलेल्या केस डायरी बाबत न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.

धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथे एका व्यक्तीवर राजकीय स्वरूपाचे कारवाया यापूर्वी झाल्या होत्या. मात्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक कारवाई होऊ शकते, असे सांगून संबंधितांकडून दोन लाख रुपये लाचेची मागणी करण्यात आली. या प्रकरणात उपअधीक्षक अभिषेक पाटील यांनी या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर दोंडाईचा येथे सापळा लावला. यावेळी तक्रारदाराकडून पैसे स्वीकारत असताना नितीन मोहने आणि अशोक पाटील या दोघांना रंगेहात पकडण्यात आले. दरम्यान हि लाच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या संमतीने मागितली आणि स्वीकारली गेल्याच्या कारणावरून त्यांना देखील या प्रकरणात अटक करण्यात आली. आज पहाटे सहा वाजेपर्यंत कागदोपत्री कार्यवाही सुरू होती. त्याचप्रमाणे शिंदे यांच्या घर झडतीमध्ये देखील कागदपत्र आणि दागिने तसेच रोख रक्कम सापडल्याचा दावा तपास पथकाने केला. दरम्यान आज सायंकाळी तिघांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी तपास अधिकारी यांनी या गुन्ह्याची माहिती न्यायालयासमोर सादर केली. त्याचप्रमाणे शिंदे यांच्या घरातून मोठ्या रकमेचे दागिने, काही खरेदी खत तसेच रक्कम मिळाल्याची माहिती दिली. मात्र न्यायालयाने जप्त केलेल्या माहितीचा उल्लेख केस डायरीमध्ये का करण्यात आला नाही. तसेच घर झडतीचा पंचनामा संदर्भात देखील खुलासा विचारण्यात आला. त्यामुळे घर झडतीचा पंचनामा न्यायालयात सादर करण्याचे आदेश देण्यात आले. परिणामी तपास पथकाने धावपळ करीत हा पंचनामा न्यायालयात सादर केला. तपास पथकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयातून जप्तीचा पंचनामा मागवून न्यायालयासमोर सादर केला. यानंतर सरकारी पक्षाचे वतीने सहाय्यक सरकारी अभियोक्ता गणेश पाटील यांनी तपासासाठी तीनही आरोपींची कोठडी मिळणे गरजेचे असल्याचे सांगितले. तर आरोपी पक्षाच्या वतीने ऍड निलेश मेहता यांनी लाचेच्या प्रकरणात संबंधित संशयीतांना काल सायंकाळपासून ताब्यात घेण्यात आले. या संदर्भातील वृत्त देखील प्रकाशित झाले. मात्र त्यांना सकाळी अटक करण्यात आल्याची माहिती न्यायालयात दिली. या कालावधीमध्ये त्यांचे आवाजाचे नमुने घेणे शक्य होते, ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली त्याचप्रमाणे घर झडतीत सापडलेले स्त्रीधन हे माहेर कडून आलेले असल्याचा खुलासा देखील करण्यात आला. दरम्यान दोन्ही पक्षाचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने तीनही आरोपींना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news