पिंपळनेर : (जि.धुळे) पुढारी वृत्तसेवा- साक्री तालुक्यातील कोंडाईबारी घाटात दहिवेल गावानजिक आज सकाळी नवापूर वरुन पुणे जाणारी एसटी बसला चारचाकी वाहनाने हुलकावणी दिली. यामुळे बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने कोंडाईबारी घाटात बस वळण रस्त्यावर अज्ञात वाहनावर जाऊन धडकली. या अपघातात चालक व वाहकासह 20 प्रवासी किरकोळ जखमी झाले. सर्व जखमी प्रवाशांना परिसरातील लोकांच्या मदतीने दहिवेल व साक्री येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून धुळ्यातील श्री भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी एसटी बस (एमएच 20 बीएल 3201) नवापूर येथून पुण्याला जाण्यासाठी निघाली होती. दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास ही बस खोड्यादेव मंदिरा नजिक चढतीला आली असता भरधाव चारचाकी वाहनाने बसला हुलकावणी दिली. यामुळे बसचालकाचे नियंत्रण सुटून बस अज्ञात वाहनावर जाऊन धडकली. या अपघातात बसमधील चालक व वाहकासह सुमारे 20 प्रवासी जखमी झाले. शिवाय बसचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघाताची माहिती मिळताच 108 क्रमांकावरील रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली होती. रुग्णवाहिकेद्वारे सर्व जखमींना धुळ्यातील हिरे रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या अपघातात जखमी झालेल्यांमध्ये गोवर चौधरी (11)रा.दहिवेल, स्वीटी प्रदीप सुडके रा.कालदा, निकिता सुनिल पवार(23)रा.चिचपाडी, भिमसिंग(73),शेख युसुफ शेख दादमिया 70)रा.औरंगाबाद, भाऊसाहेब भिमराव खरे(42)रा.टिटाणे, वैशाली भाऊसाहेब खरे(40),रोहिणी अशोक वसावे(23) रा.कोळदे, नानाजी रामभाऊ मोरे (59),रोशनी महेंद्र गावित (23)वघाडे, सुमित्रा दिनकर गावित(31)कोळदे, गंगा प्रभू गावित(30)रा.सोनखेड, नुपूर निलेश गावित (22)रा.कामोद, रणीलाल भटू गवळे(50)रा.नवापूर, सिमा राकेश सावळे(30)रा.ताराबाद, विलास सजन गोसावी(39)रा.पिंपळनेर, पूजा विकास गोसावी(36)रा.पिंपळनेर, याभेस गावित(21)रा.नवापूर, रुतिजा सुशिल गावित (21),शितल नदेश गावित (21)रा.नवापूर,दिपाली समधान मोरे(20)रा.टिटाणे आदींचा समावेश आहे.
याप्रकरणी उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती.
हेही वाचा :