Dharashiv Lok Sabha | धाराशिवमध्ये दीर आणि भावजय यांच्यात लढत

Dharashiv Lok Sabha | धाराशिवमध्ये दीर आणि भावजय यांच्यात लढत
Published on
Updated on

साधारण 1996 पासून प्रत्येक निवडणुकीत खासदारकीसाठी नवाच चेहरा लोकसभेत पाठवणार्‍या या मतदार संघात यंदा दीर-भावजय यांच्यात 'काँटे की टक्कर' होत आहे. ठाकरे शिवसेनेचे निष्ठावंत विद्यमान खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या विरोधात सौ. अर्चना राणाजगजितसिंह पाटील या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवित आहेत. त्यांचे पती राणाजगजितसिंह हे भाजपचे आमदार आहेत.

वास्तविक धाराशिव लोकसभा मतदारसंघ हा पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्याचे संयुक्त प्रतिनिधित्व करणारा मतदारसंघ आहे. जिल्ह्यातील धाराशिव, परंडा, तुळजापूर, उमरगा या चार विधानसभा मतदार संघांसह लातूर जिल्ह्यातील औसा तसेच सोलापूर जिल्ह्यातील बार्शी विधानसभा मतदार संघाचा यात समावेश होतो. 1998 व 2019 चा अपवाद वगळता 1996 पासून या मतदार संघावर शिवसेनेचे वर्चस्व आहे. 1996 पासूनचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक निवडणुकीत नवाच चेहरा लोकसभेत पोहोचला आहे. तसेच विद्यमान खासदाराला त्याच पक्षाकडून पुन्हा उमेदवारीही मिळालेली नाही. 2014 मध्ये डॉ. पद्मसिंह पाटील यांचा अपवाद होता. मात्र, 2019 ची विजयाची पुनरावृत्ती डॉ. पाटील यांना करता आली नाही.

अर्थात, गेल्या दोन वर्षांत राजकीय परिस्थितीही बरीच बदलली आहे. सध्याचे राजकीय संदर्भही बदलले आहेत. काँग्रेस तसेच शरद पवारांची राष्ट्रवादी अशा दोन पक्षांचे पाठबळ खा. राजेनिंबाळकरांना आहे. या जिल्ह्यात शिवसेनेच्या निष्ठावंतांची ताकद राजेनिंबाळकरांच्या बाजूने आहे. शिवाय जिल्हाप्रमुख आ. कैलास पाटील, राष्ट्रवादीचे माजी आ. राहुल मोटे, शिवसेनेचे माजी आ. ज्ञानेश्वर पाटील, माजी आ. दिनकर माने, माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, काँग्रेसचे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, माजी मंत्री दिलीप सोपल हे महाविकास आघाडीसोबत आहेत.

तर महायुतीकडे शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार तथा पालकमंत्री तानाजी सावंत, आ. ज्ञानराज चौगुले, भाजपचे राणाजगजितसिंह पाटील, औशाचे आ. अभिमन्यू पवार, बार्शीचे आ. राजेंद्र राऊत हे पाच आमदार आहेत. पाच आमदारांचे पाठबळ सौ. अर्चना पाटील यांच्यासोबत असल्याने ही लढत तुल्यबळ झाली आहे. आजपर्यंत सौ. पाटील यांच्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची बार्शीत प्रचारसभा झाली आहे. तर ओमराजेंसाठी खा. शरद पवार यांनी तुळजापुरात सभा घेतली आहे. प्रत्येक शहरातील मातब्बर नेता फोडून आपल्या पक्षात घेण्याकडे या दोन्ही प्रमुख उमेदवारांचे अजूनही प्रयत्न सुरूच आहेत. त्यामुळे आठवड्यातून दोन-तीन तरी दखलपात्र प्रवेशसोहळे होतच आहेत. वंचित बहुजन आघाडीने बार्शी येथील भाऊसाहेब आंधळकर यांना रिंगणात उतरविले आहे. या मतदार संघात 31 उमेदवार निवडणूक लढवित आहेत. आजपर्यर्ंत महागाई, जिल्ह्याचा रखडलेला विकास, मराठा आरक्षण आंदोलन, मेडिकल कॉलेजचे श्रेय, प्रस्तावित सोलापूर- तुळजापूर – धाराशिव रेल्वे मार्ग, कृष्णा-मराठवाडा योजनेचे पाणी, आदी मुद्दे दोन्ही बाजूंकडून चर्चेत आले आहेत.

या मतदार संघात जातीय समीकरणेही घट्ट आहेत. लिंगायत समाजाचा प्रभाव औसा, उमरगा, तुळजापूर तसेच बार्शी तालुक्यांत आहे. तर मराठा समाजाचे प्राबल्य लोहारा, धाराशिव, कळंब, भूम, परंडा, वाशी तसेच तुळजापूर तालुक्याच्या काही भागावर आहे. त्यामुळे जातीय समीकरणेही आपल्या पथ्यावर पडतील, असे प्रयत्न दोन्ही उमेदवारांकडून सुरू आहेत. प्रत्येक गाव व प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीकडून होत आहे. तर जाहीर सभा, कॉर्नर सभांच्या माध्यमातूनही महायुतीनेही हिरिरीने प्रचार सुरू केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची धाराशिव शहरात सभा झाली आहे. तर लवकरच उद्धव ठाकरे यांचीही सभा होत आहे.

पक्षफुटीमुळे शरद पवार, उद्धव ठाकरेंना असलेली सहानुभूती, वैयक्तिक खा. राजेनिंबाळकरांची क्रेझ तसेच सरकारविरोधी नाराजीचा फायदा उठवत खा. ओमराजे पुन्हा लोकसभेत जातात की मोदींचा करिश्मा, पाच आमदारांचे पाठबळ व आ. राणाजगजितसिंह यांच्या धडाडीचा फायदा घेत सौ. पाटील नव्या चेहर्‍याची परंपरा कायम राखत विजय मिळवणार, हे 4 जूनला समजणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news