काँग्रेसच्या नेत्यात लोकसभा लढविण्याची धमक नाही : धनंजय महाडिक

काँग्रेसच्या नेत्यात लोकसभा लढविण्याची धमक नाही : धनंजय महाडिक

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : गेल्या तीन दशकांनंतर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला मिळत आहे. एवढी चांगली संधी असतानाही काँग्रेसचे जिल्ह्यातील नेते आपल्या गळ्यातील माळ दुसर्‍याच्या गळ्यात घालत आहेत. तुम्ही का उभा राहत नाही? लोकसभा निवडणूक लढविण्याची धमक तुमच्यात नाही काय, असा टोला खा. धनंजय महाडिक यांनी आ. सतेज पाटील यांना लगावला. दरम्यान, हातकणंगलेची जागा भाजपला मिळाली आणि शौमिका महाडिक यांना लढण्याचा आदेश पक्षाने दिला तर निश्चितपणे त्याचे पालन केले जाईल, असेही महाडिक म्हणाले.

काँग्रेसकडून बाजीराव खाडे, डॉ. चेतन नरके लढण्यास इच्छुक आहेत. गेल्या दोन-तीन वर्षांपासून ते तयारी करत आहेत; परंतु षड्यंत्र करून भावनिक वातावरण करत काँग्रेसच्या नेत्याने आपल्या गळ्यातील माळ दुसर्‍याच्या गळ्यात घातली आहे. डावपेच करून भावनिक वातावरण करत निवडणूक लढवण्याची त्यांची सवय आहे. गेल्या वेळी आमचं ठरलंय, यावेळी जनतेचं ठरलंय. जनतेला तुमचं आता सगळं कळलंय. नेता किती फसवा आणि दिशाभूल करणारा आहे,क हे जनेतेला कळाले आहे. त्यामुळे जनतेने काय ठरवलंय तेदेखील लवकरच कळेल, असेही महाडिक म्हणाले.

विधान परिषद बिनविरोध करताना राजाराम साखर कारखाना निवडणुकीत पॅनेल करणार नही, असा शब्द माजी पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिला होता. याला साक्षीदार आ. विनय कोरे आहेत; परंतु ही निवडणूक लागली तेव्हा या नेत्यांनी आपण शब्द न पाळणारे, शब्द पलटवणारे, खोटे बोलणारे असल्याचे दाखवून दिले आहे. थेट पाईपलाईनचा खेळखंडोबा झाला आहे. त्यामुळे फसवणार्‍या या नेत्यास दणका बसल्याशिवाय राहणार नाही, असेही महाडिक यांनी सांगितले.

लोकसभेच्या कोल्हापूरच्या जागेबाबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे कार्यकर्त्यांनी आग्रह धरला होता. तसा अहवाल दिल्लीला गेल्यामुळे या मतदारसंघाची चर्चा अधिक झाली. महायुतीतील घटक पक्षातील ज्यांना उमेदवारी मिळेल त्यांच्या पाठीशी राहण्याची भूमिका भाजपची असणार आहे, असेही महाडिक म्हणाले.

हसन मुश्रीफ चांगला चेहरा

समरजित घाटगेंना उमेदवारी मिळाली तर ते ताकदीने लढतील. कोल्हापूरची जागा राष्ट्रवादीला गेली तर लोकसभा निवडणुकीसाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ चांगला चेहरा आहे; मात्र त्यांची काय भूमिका आहे, हे आपणास माहीत नाही. महायुतीतील छोट्या घटक पक्षांची नाराजी लवकरच वरिष्ठ नेते दूर करतील, असेही महाडिक यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news