पुणे जिल्ह्यातील कनेरसरने दिले देशाला दोन सरन्यायाधीश, धनंजय चंद्रचूड यांच्या रूपाने मिळाला दुसऱ्यांदा बहुमान

पुणे जिल्ह्यातील कनेरसरने दिले देशाला दोन सरन्यायाधीश, धनंजय चंद्रचूड यांच्या रूपाने मिळाला दुसऱ्यांदा बहुमान

शिक्रापूर, पुढारी वृत्तसेवा: न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांची 50 वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती जाहीर झाली आहे. यापूर्वी त्यांचे वडील न्यायमूर्ती यशवंतराव चंद्रचूड यांनी सरन्यायाधीशपदी काम पाहिले आहे. देशाचे सरन्यायाधीश म्हणून पिता-पुत्रांनी काम पाहण्याचा हा आगळावेगळा विक्रम होत आहे. याचबरोबर कनेरसर (ता. खेड) या त्यांच्या मूळ गावाला देशाला दोन सरन्यायाधीश देण्याचा बहुमान मिळत आहे, याचा सार्थ अभिमान कनेरसर ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.

मावळते सरन्यायाधीश यू. यू. लळीत यांनी आपले उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांचे नाव केंद्र सरकारला सुचविल्यानंतर आता सरकारने त्यांची नियुक्ती जाहीर केली आहे. कनेसरचे हे चंद्रचूड कुटुंब कुशाग्र बुद्धिमत्तेचे म्हणून ओळखले जाते. कनेरसर (ता. खेड) येथे आजही त्यांचा प्रशस्त असा भव्य वाडा सुस्थितीत आहे. त्यांच्या कुटुंबातील सदस्याने दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे पूर्वज चंद्रचूड हे पेशव्यांचे वकील म्हणून ओळखले जात. त्यांना खेड तालुक्यातील कनेरसरसह सात गावे वतन म्हणून पेशव्यांनी दिली होती. कनेरसर या ठिकाणी सुमारे 250 वर्षांपूर्वीचा त्यांचा वाडा अजूनही सुस्थितीत आहे. तसेच, चंद्रचूड कुटुंबाची शेती ही पूर-कनेरसर या गावांमध्ये आहे.

त्यांच्या कुटुंबातील सदस्या सुनंदा गोविंद चंद्रचूड यांनी सांगितले की, आमचे कुटुंब सुमारे 250 वर्षांपासून येथे वास्तव्यास आहे. गावातील शेतसारा जमा करण्याचे काम कुटुंब करीत असे. चंद्रचूड कुटुंबाच्या अनेक पिढ्यांचे वास्तव्य येथे झाले आहे. कालांतराने शिक्षणानिमित्त सरन्यायाधीश यशवंतराव चंद्रचूड, धनंजय चंद्रचूड व कुटुंबातील इतर सदस्य पुणे, मुंबई या ठिकाणी स्थलांतरित झाले. परंतु, कनेरसर येथे आमचे चंद्रचूड कुटुंबाचे कुलदैवत नरसिंह या देवतेचे मंदिर आहे. या कुलदैवताच्या पूजा व उत्सवासाठी सर्व चंद्रचूड कुटुंब वर्षातून एकदा एकत्र येते. परंतु, सरन्यायाधीश चंद्रचूड हे कामाच्या व्यस्ततेमुळे आवर्जून वेळ मिळेल तेव्हा देवाच्या उत्सवासाठी उपस्थित राहत असतात.

माजी सरन्यायाधीश यशवंतराव चंद्रचूड यांच्या नावाने कनेरसर येथे भव्य वाचनालय उभे करण्याचा कनेरसर येथील ग्रामस्थांचा मानस आहे. तसेच देशाला दोन सरन्यायाधीश देण्याचा बहुमान गावाला मिळाल्यामुळे येथील प्रत्येक नागरिकाला त्याचा अभिमान आहे. यानिमित्त या गावची ओळख आता आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेली आहे, असेही येथील नागरिक आवर्जून सांगत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news