पुढारी ऑनलाईन डेस्क : कराचीमध्ये सध्या पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड पहिला कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा फलंदाज डेव्हॉन कॉनवे ( Devon Conway ) याने आपल्या नावावर नव्या विक्रमाची नोंद केली आहे. अशी कामगिरी करणारा तो न्यूझीलंडचा पहिला खेळाडू ठरला आहे.
पाकिस्तान विरुद्ध कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यातील पहिल्या दिवशी खेळ संपला तेव्हा कॉनवे ८२ धावांवर नाबाद होता. त्याने १५६ चेंडूत १२ चौकार फटकावत ८२ धावा केल्या. या कामगिरीमुळे कसोटीमध्ये सर्वात जलद (कमी डाव खेळत) एक हजार धावा पूर्ण करणारा तो न्यूझीलंडचा पहिला फलंदाज ठरला आहे.
कॉनवे याने ११ कसोटी सामन्यांमध्ये १९ डावांमध्ये ५५.५५ च्या सरासरीने १००० धावा केल्या आहेत. यामध्ये तीन शतके आणि पाच अर्धशतकांची खेळी केली आहे. त्याची सर्वोत्तम धावसंख्या २०० आहे. या कामगिरीमुळे त्याने २० डावांमध्ये १००० धावा पूर्ण करणारा माजी न्यूझीलंडचा फलंदाज जॉन रीड याचा विक्रम मोडित काढला आहे.
२५ जानेवारी १९८५ रोजी जॉन रीड याने वीसाव्या डावांमध्ये एक हजार धावा पूर्ण केल्या होत्या. विशेष म्हणजे रीड यानेही पाकिस्तान विरुद्धच्या कसोटी सामन्यातच हा विक्रम केला होता. न्यूझीलंडचा फलंदाज मार्क रिचर्डसन यानेही २० डावांमध्ये एक हजार धावा पूर्ण केल्या होत्या. त्याने २००१मध्ये बांगलादेशविरुद्ध ही कामगिरी केली होती.
न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात प्रथम फलंदाजी करताना कर्णधार बाबर आझम याच्या १६१ धावा आणि आगा सलमान याच्या १०३ आणि सर्फराज अहमदच्या ८६ धावांच्या जोरावर पाकिस्तानने ४३८ धावा केल्या. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टीम साऊदीने ६९ धावांमध्ये तीन बळी घेतले. एजाज पटेल, ईश सोधी आणि मायकेल ब्रेसवेल यांनी प्रत्येकी दोन तर नील वॅगनरने एक विकेट घेतली.
न्यूझीलंडच्या पहिल्या डावाची सुरुवात दमदार झाली. दुसर्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंड संघाने बिनबाद १६५ धावा केल्या आहेत. सलामीवीर कॉनवे ८२ तर टॉम लॅथम हे ७८ धावांवर नाबाद होते.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद १००० धावा करण्याचा विक्रम इंग्लंडचे फलंदाज हर्बर्ट सटक्लिफ यांच्या नावावर आजही अबाधित आहे. हर्बर्ट यांनी १३ फेब्रुवारी १९२५ रोजी मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक हजार धावा पूर्ण केल्या होत्या. त्यांनी केवळ १२ व्या डावांमध्ये एक हजार धावा पूर्ण केल्या होत्या. त्याचा विक्रम आजपर्यंत कोणीही मोडू शकलेले नाही. विशेष म्हणजे सटक्लिफ यांनी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पणानंतर 244 दिवसांनंतर ही ऐतिहासिक कामगिरी आपल्या नावावर नोंदवली होती. वेस्ट विंडीजचा फलंदाज एव्हर्टन वीक्स यानेही १२ डावांमध्ये एक हजार धावा पूर्ण केल्या, मात्र पदार्पणाच्या एक वर्ष १४ दिवसांनी त्याने हा विक्रम केला होता. त्यामुळे हर्बर्ट सटक्लिफ यांच्या नावावर हा विक्रम आजही अबाधित आहे. डेव्हॉन कॉनवेने पदार्पणानंतर एक वर्ष 207 दिवसांनी हा विक्रम आपल्या नावावर केला आहे. कॉनवेचा याचा हा ११वा कसोटी सामना आहे.