‘महायुती’चा तिढा लवकरच सुटणार; जागावाटपाची दिल्लीत किल्ली; फडणवीस दिल्लीत

‘महायुती’चा तिढा लवकरच सुटणार; जागावाटपाची दिल्लीत किल्ली; फडणवीस दिल्लीत

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रातील आपल्या वाट्याच्या 20 जागांवरील उमेदवारांंची यादी भाजपने जाहीर केली असली, तरी 'महायुती'तील इतर जागांवरचा तिढा कायम आहे. आता हा तिढा थेट दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी सुटण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी दिल्लीला रवाना झाले असून, मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपची तिसरी यादी 20 मार्चपूर्वी जाहीर होईल, असे म्हटले आहे.

महाराष्ट्रात महायुतीचे जागावाटपाचे चर्चेचे गुर्‍हाळ गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. ते आता अंतिम टप्प्यात आल्याचे महायुतीच्या नेत्यांचे म्हणणे आहे. जागावाटप लवकरात लवकर पूर्ण करण्याकडे भाजप श्रेष्ठींचे लक्ष लागले असून, त्याद़ृष्टीने आता हालचालींना वेग आला आहे.

आता दिल्लीत ठरणार

महायुतीच्या जागावाटपाचा तिढा दिल्लीत सुटण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सोमवारीच दिल्लीला रवाना झाले असून, सायंकाळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत कोणत्या पक्षाला कोणत्या जागा; याशिवाय शिंदे गट व अजित पवार गटाच्या उमेदवारांच्या निवडून येण्याच्या क्षमतेवरही चर्चा झाली.

मुख्यमंत्री मंगळवारी दिल्लीत

सोमवारच्या दिल्लीतील बैठकीत ठरल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार मंगळवारी दिल्लीत जाण्याची शक्यता आहे. महायुतीच्या तिन्ही पक्षांत बहुतांश जागांवर एकमत झाले असले, तरी सात ते दहा जागांवर रस्सीखेच सुरू असल्याचे सांगण्यात आले.

उमेदवार तुमचे, चिन्ह आमचे

महायुतीच्या जागावाटपात फक्त जिंकून येणार्‍या उमेदवारांनाच तिकिटे देण्यात यावीत, असा अमित शहा यांचा आग्रह आहे. याशिवाय, शिंदे गट व अजित पवार गटातील काही उमेदवारांना भाजपच्या चिन्हावर उभे करावे, असा आग्रहही भाजपच्या वतीने धरण्यात आला असला, तरी शिंदे गट व अजित पवार गटाने त्याला स्पष्ट विरोध केला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news