Devendra Fadnavis: ‘मविआ’च्या काळातच टाटा एअरबस प्रकल्प महाराष्ट्रातून गेला : देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस ( संग्रहित छायाचित्र )
देवेंद्र फडणवीस ( संग्रहित छायाचित्र )

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : मविआ सरकारच्‍या काळातच टाटा एअरबस प्रकल्प महाराष्ट्रातून गेला. हा प्रकल्प महाराष्ट्रात होणार होता; पण नागपूरमध्ये हा प्रकल्प होत असल्यानेच मविआने हा प्रकल्प नाकारला, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी आज ( दि. 31) पत्रकार परिषदेत दिली.

महाराष्ट्रातून वेदांता, फॉक्सकॉनसारखे कोट्यवधी रुपयांचे बजेट असलेले प्रकल्प एकामागून एक गुजरातमध्ये जात आहेत. याबाबत उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,  २०२१ मध्ये महाराष्ट्रात वातावरण चांगले नसल्याने अधिकाऱ्यांनी सांगतानाच टाटा एअरबस प्रकल्प महाराष्ट्रातून हलविण्याचा निर्णय घेतला. मविआच्या काळातील हे अपयश असून, आता मात्र आकांडतांडव करत मविआ सरकारचे खापर आमच्यावर फोडले जात असल्याचे  फडणवीस यांनी सांगितले.

महाराष्‍ट्रात लवकरच येणार रिफायनरी प्रकल्‍प

महाराष्ट्रातून उदयोग बाहेर जात असल्याचा आरोप करत विरोधी पक्ष महाराष्ट्राची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे. महाराष्ट्रात लवकरच रिफायनरी प्रकल्प येणार आहे. या रिफायनरीतून ३ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात येणार आहे. याबद्दल मी केंद्र सरकारचे आभार मानतो, असेही ते म्हणाले. राज्‍यातील उद्‍योगाची विस्कटलेली घडी बसविण्याचा आमच्या सरकारचा प्रयत्न आहे. सुभाष देसाई यांनी मविआच्या काळात फॉक्सकॉन महाराष्ट्रात येणार नसल्याचे म्हटले होते. त्यामुळे विरोधकांना यावर बोलण्याचा अधिकार नाही, असेही फडणवीस यांनी नमूद केले.

सत्ता गेल्याने 'मविआ'च्या मानसिकतेवर परिणाम झाला आहे. त्यामुळे ते रोज उठून नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राची बदनामी करत आहेत. पण नरेंद्र मोदींनीच आजपर्यंत सर्वाधिक गुंतवणूक महाराष्ट्रात आणली आहे. त्यामुळे मविआ जेवढी महाराष्ट्राची बदनामी करेल तितके मी एक्सपोज करेन, असा इशाराही फडणवीस यांनी या वेळी दिला.

फडणवीसांची मोठी घोषणा: महाराष्ट्र होणार इलेक्ट्रॉनिक्स हब

माहिती आणि तंत्रज्ञानाच्या काळात इलेक्ट्रॉनिक्सला खूप महत्त्व असणार आहे. येत्या काळात या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. त्यामुळे भारत सरकारने इलेक्ट्रॉनिक्स विषयक राष्ट्रीय धोरणांतर्गत महाराष्ट्राचा विचार केला आहे. केंद्र सरकारने पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथे इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरला मान्यता  मान्यता दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्र लवकरच इलेक्ट्रॉनिक्स हब होणार असल्याची घोषणा करत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी पंतप्रधानांचे आभार मानले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news