किल्ले राजगडचा विकास आराखडा अंतिम टप्प्यात

किल्ले राजगडचा विकास आराखडा अंतिम टप्प्यात

खडकवासला; पुढारी वृत्तसेवा : हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी असलेल्या किल्ले राजगडाचा आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने पायाभूत विकास आराखडा तयार करण्यात येत आहे. हा आराखडा अंतिम टप्प्यात आला आहे. राजगडाला शिवकालीन वैभव पुन्हा प्राप्त व्हावे तसेच गडावर येणारे पर्यटक, अभ्यासक, शिवभक्तांना पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रस्तावित कामांचा विकास आराखड्यात समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, गडावरील ऐतिहासिक वास्तू, प्रवेशद्वार, बुरुजांच्या डागडुजीची जवळपास 25 टक्के कामे पावसाळ्यापूर्वी होणार आहेत. या कामांसाठी शासनाने साडेचार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे.

पहिल्या टप्प्यातील मंजूर कामे सध्या सुरू आहेत. गडावर जोरदार वारे व पाऊस असल्याने पावसाळ्यात कामे करता येत नाही. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी पाल दरवाजा क्रमांक एक व दोनच्या मार्गावरील डागडुजी, बालेकिल्ल्यावरी रेलिंग व पायर्‍यांची दुरुस्ती तसेच छत्रपती शिवरायांच्या राजसदरेच्या पायर्‍या आदी कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी पन्नास मजूर, कारागीर गडावर तळ ठोकून आहेत. मात्र, अवकाळी पावसामुळे डागडुजीच्या कामात अडथळे येत आहेत.

ऐतिहासिक दृष्ट्या राजगडाला महत्त्वाचे स्थान आहे. परकियांची शेकडो वर्षांची गुलामगिरी नष्ट करून छत्रपती शिवरायांनी स्वतंत्र राज्य स्थापन केले. 1647 ते 1672 असे तब्बल 25 वर्षे राजगडावरून शिवरायांनी हिंदवी स्वराज्याचा राज्यकारभार पाहिला.ज्वलंत इतिहास असलेल्या किल्ले राजगडाला पुन्हा शिवकालीन वैभव प्राप्त व्हावे यासाठी राज्य शासनाने प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू केल्या आहेत.

विकास आराखडा महिनाभरात वरिष्ठ कार्यालयाला सादर केला जाणार आहे. गडावर येणार्‍या पर्यटकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे पर्यटकांसाठी विविध सुविधा प्रस्तावित आहेत. गडाच्या मुख्य पाल दरवाजा मार्गावरील पायर्‍या, बुरूज उन्मळून आले आहेत. त्यामुळे पावसाळ्यात पर्यटकांना ये – जा करताना मोठी कसरत करावी लागते. गुंजवणे दरवाजा मार्गाचीही पडझड झाली आहे. या दोन्ही शिवकालीन राजमार्गाची तसेच चिलखती बुरूज आदी कामे शिवकालीन बांधकाम शैलीत करण्यात येणार आहेत.

                                       – विलास वाहणे, सहसंचालक, पुरातत्व विभाग

रोप-वे साठी केंद्रीय मंत्री सरसावले

किल्ले रायगडाच्या धर्तीवर किल्ले राजगडाचा विकास करण्यात यावा यासाठी शासनाने वरिष्ठ पातळीवर वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी वन, बांधकाम, पर्यटन, महसूल व संबंधित विभागांना सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच राजगडावरील प्रास्ताविक रोप-वेसाठी वरिष्ठ केंद्रीय मंत्री सरसावले आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news