पुढारी ऑनलाईन : राज्यातील अनेक भागांत धुवाँधार पाऊस सुरु आहे. यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील जोरदार पाऊस आणि पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. मंत्रालयात सकाळी ९ वाजता ही बैठक होणार आहे. (Maharashtra rains)
जोरदार पाऊस आणि पुरामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेणार असल्याची माहिती अजित पवार यांनी काल सोमवारी विधानसभेत दिली होती. "मी मंगळवारी सर्व जिल्हाधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेईन. यावेळी पूर परिस्थितीचा आढावा घेतला जाईल," असे त्यांनी विधानसभेत सांगितले होते.
भारतीय हवामान विभागाच्या (IMD) मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने राज्यात अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. २७ जुलैपर्यंत राज्यातील ६ जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांत २७ जुलैपर्यंत अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर आज मंगळवारी मुंबईत अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
याआधी गेल्या शुक्रवारी मुसळधार पावसामुळे पाणी साचल्याने मुंबई आणि आजूबाजूच्या भागातील रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती. (Maharashtra rains)
हे ही वाचा :