कोरोनानतंर छापील लग्नपत्रिकांना पुन्हा वाढली ’डिमांड’

कोरोनानतंर छापील लग्नपत्रिकांना पुन्हा वाढली ’डिमांड’
Published on
Updated on

पिंपरी(पुणे) : कोरोना काळामध्ये डीजीटल लग्नपत्रिकांचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे आता छापील लग्नपत्रिका कालबाह्य होणार का, असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, सध्या श्रीमंतांचे विवाह सोहळे थाटामाटात होत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा विविध आकारांतील आकर्षक छापील लग्नपत्रिकांची 'डिमांड' वाढली आहे.

कोरोना काळामध्ये मर्यादित वर्‍हाडी मंडळींच्या उपस्थित लग्नसोहळे होत होते. त्यामुळे डिजिटल पत्रिकांची मागणी वाढली होती. त्यानुसार, व्हॉट्सअप, फेसबुकवर थेट संदेशाद्वारे लग्नपत्रिका पाठविण्यात येत होत्या. पर्यायाने, आता हीच पद्धत रुढ होते की काय, असे चित्र निर्माण झाले होते. मात्र, कोरोनाचा प्रभाव ओसरताच श्रीमंतांचे विवाहसोहळे धूमधडाक्यात होऊ लागले आहे. पर्यायाने, छापील लग्नपत्रिकांची चलती सुरू झाली आहे. लग्नपत्रिका छापतानाही ती अधिक आकर्षक कशी होईल, या दृष्टीने विशेष भर दिला जात आहे.

दिवाळीनंतर तुळशीचे लग्न लागले की लग्नसराईला प्रारंभ होतो. त्यानंतर मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत विवाहाचे मुहूर्त असतात. कोरोना काळात विवाह समारंभ मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये होत होते. तेव्हा सामान्य कुटुंबातील मुला-मुलींचे विवाह मोठ्या प्रमाणात झाले. त्या वेळी उच्च मध्यमवर्गीय आणि श्रीमंत कुटुंबातील लग्नांमध्येही संख्येला मर्यादा होती. त्यामुळे या गटातील विवाह हे छोटेखानी पद्धतीने हॉटेलमध्ये लावले जात होते. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर विवाह सोहळे थाटामाटात होऊ लागले. त्यामुळे सध्या छापिल पत्रिका काढण्याकडे कल वाढला आहे.

सर्वसामान्यांकडून डिजिटल पत्रिकांचा वापर

सर्वसामान्य आणि गरीब कुटुंबीयांना छापील लग्नपत्रिकांचा खर्च परवडणारा नाही. आधुनिक काळात डिजिटल पत्रिका सर्वच स्तरातील लोकांना फायदेशीर असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत. छापील एका पत्रिकेला पाच ते दीडशे रुपये इतका खर्च येतो. जेवढ्या पत्रिका छापल्या असतील त्या प्रमाणात त्यावर खर्च करावा लागतो. त्यामुळे केवळ लग्नपत्रिकांवरच हजारो रुपये खर्च येतात. त्याऊलट डिजिटल पत्रिकेला केवळ शंभर रुपये इतका खर्च येत असल्याने सर्वसामान्यांकडून डिजिटल पत्रिकांवर भर दिला जात आहे.

डिजिटल पत्रिका एका क्षणात नातेवाईकांपर्यंत

व्हॉट्सअप, फेसबुक आदी सोशल मीडियाच्या माध्यमातून डिजिटल लग्नपत्रिका परिचयातील मित्र परिवार, नातेवाईक यांच्यापर्यंत एका क्षणात पोहचविणे शक्य होते. पर्यायाने, घरोघरी जाऊन लग्नपत्रिका देणे बंधनकारक राहिले नाही. सर्वसामान्यांच्या विवाह सोहळ्यात निमंत्रण देण्यासाठी लागणारा वेळ, पैसा यात बचत करण्यावर भर दिला जात आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news