मुंबई : पुढारी वृत्तसेवा : मतदानाच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात १६ प्रचारसभांसह केरळ आणि कर्नाटकातही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारसभा केल्या. राज्यात पुढील टप्प्यातील प्रचारासाठी फडणवीस यांच्या १२५ सभांचे नियोजन करण्यात आले आहे. महायुतीतील उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज भरताना तसेच विविध भागात प्रचारसभांचे नियोजन केले जात आहे.
महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातील पाच जागांसाठी १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. भाजपचे दिग्गज नेते नितीन गडकरी, सुधीर मुनगंटीवार निवडणुकांच्या रणांगणात आहेत. पहिल्या टप्प्यातील प्रचार बुधवारी सायंकाळी संपणार आहे. आतापर्यंत देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भात १६ प्रचारसभांना संबोधित केले आहे. याशिवाय, केरळचे दौरे करत राजधानी तिरूवनंतपुरम, कोल्लम आणि थंपानूर येथे भाजप उमेदवारांसाठी प्रचारसभा आणि पत्रकार परिषदा घेतल्या. याशिवाय कर्नाटकातही फडणवीस यांचा प्रचार दौरा झाला.
दुसरीकडे महाराष्ट्रातील महायुतीच्या जागावाटपावरून निर्माण झालेले वाद आणि नाराजीनाट्य थोपविण्यासाठी आठवडाभर मुंबईतील सागर बंगल्यावर मॅरेथाॅन बैठकांनंतर आता फडणवीसांनी आपला मोर्चा प्रचाराकडे वळविला आहे. पहिल्या टप्प्यात १६ सभांची पहिली फेरी पूर्ण करण्यात आली आहे. आता पुढील चार टप्प्यातील प्रचारासाठी फडणवीस यांच्या एकूण १२५ सभांचे नियोजन भाजपकडून करण्यात आले आहे. भाजप उमेदवारांसोबतच शिवसेना शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारांच्या मतदारसंघातही फडणवीसांच्या प्रचारसभा होणार आहेत.ॉ
हेही वाचा