पुढारी ऑनलाईन: खेळाडूंच्या लैंगिक शोषणाचे आरोप असलेले भारतीय कुस्ती संघाचे (डब्ल्यूएफआय) माजी अध्यक्ष, खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात गुरूवारी (दि.१५ जून) दिल्ली पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले. दोन वेगवेगळ्या न्यायालयात पोलिसांनी हे आरोपपत्र दाखल केले असून, यातील एका प्रकरणात मात्र पोलिसांनी सिंह यांना 'क्लीनचीट' दिल्याचे कळते.
सहा महिला कुस्तीपटूंकडून करण्यात आलेल्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात पोलिसांनी राऊज एवेन्यू न्यायालयात एक हजार पानी आरोपपत्र दाखल केले. तर,अल्पवयीन कुस्तीपटूने केलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणात पटियाला हाऊस न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. पोलीस दलाने 'पोक्सो' प्रकरण रद्द करण्यासाठी अहवाल दाखल केला आहे. ४ जुलैला याप्रकरणी सुनावणी घेण्यात येणार आहे.
पोक्सो प्रकरणात तक्रारीच्या आधारे करण्यात आलेल्या तपासाअंती कुठलेही पुरावे मिळाले नाही, असे ५५० पानी अहवालातून पोलिसांनी स्पष्ट केले आहे. यानुसार बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधातील पोक्सो अंतर्गत दाखल गुन्हा हटवण्याची शिफारस पोलिसांनी केली आहे. तक्रारकर्ती पीडितेच्या वडिलांनी तसेच पीडितेच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी हा अहवाल न्यायालयात सादर केला आहे.
७ महिला कुस्तीपटूंनी २१ एप्रिल रोजी दिल्ली पोलीस दलात बृजभूषण यांच्या विरोधात लैंगिक अत्याचाराची तक्रार दिली होती. तक्रारीनंतर २८ एप्रिल रोजी पोलिसांनी बृजभूषण यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल केले होते. ६ कुस्तीपटूंच्या तक्रारीच्या आधारे एक गुन्हा, तर १ अल्पवयीन पीडितेच्या तक्रारीवरून पोक्सो दाखल करण्यात आला होता.
कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्यावर कलम 354, 354D, 345A IPC अंतर्गत आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. तसेच POCSO प्रकरणात कथित पीडिता आणि पीडितेच्या वडिलांच्या विधानाच्या आधारावर अहवाल सादर करण्यात आला असल्याची माहिती देखील दिल्ली पोलिस जनसंपर्क अधिकारी सुमन नलवा यांनी दिली आहे.