अटक होणार नसेल तरच ‘ईडी’समोर हजर राहणार : केजरीवालांची नवी याचिका

अटक होणार नसेल तरच ‘ईडी’समोर हजर राहणार : केजरीवालांची नवी याचिका

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : दिल्‍ली मद्‍य प्रकरणी अटक होणार नसले तसेच कोणतीही दंडात्‍मक कारवाई होणार नसेल तरच आपण सक्‍तवसुली संचालनालयाकडून (ईडी) करण्‍यात येणार्‍या चौकशीला हजर राहू, असे दिल्‍लीचे मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्‍ली उच्‍च न्‍यायालयात नव्‍याने दाखल केलेल्‍या याचिकेत नमूद केले आहे. आज त्‍यांच्‍या या याचिकेवर न्यायमूर्ती सुरेश कुमार कैत यांच्‍या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.

दिल्‍ली मद्‍य धोरण प्रकरणी 'ईडी'ने केजरीवाल यांना आतापर्यंत नऊ समन्स बजावले आहेत. आज ( दि.२१ मार्च) केजरीवाल यांना चौकशीसाठी बोलावले आहे. दिल्ली उच्च न्यायालयात बुधवारी झालेल्‍या खटल्याच्या सुनावणीदरम्यान केजरीवाल यांच्‍या वतीने युक्‍तीवाद करताना ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी सांगितले की, आप नेते मनीष सिसोदिया आणि संजय सिंह यांनाही ईडीने अशाच प्रकारे अटक केली होती.ईडी अटक करेल, अशी भीती वाटत असून अटकेपासून संरक्षण दिल्यास केजरीवाल ईडी चौकशीला हजर राहण्‍यास तयार आहेत.

काय आहे प्रकरण ?

दिल्ली सरकारने 2021-22 च्या उत्पादन शुल्क धोरणांतर्गत ज्या दारू (मद्य) व्यापाऱ्यांना परवाने दिले होते, त्यांनी त्यासाठी लाच दिली होती. परवानेही आम आदमी पार्टीच्‍या मर्जीतील मद्य व्यापाऱ्यांनाच दिले गेले होते, असा आरोप आहे. आम आदमी पक्षाने हे आरोप फेटाळून लावले आहेत. दिल्लीचे नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांनी अनियमिततेमुळे मद्य धोरण रद्द केले होते आणि सीबीआय चौकशीची शिफारस केली होती. कथित मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली ईडीनेही गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी २६ फेब्रुवारी २०२३ रोजी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) दिल्‍लीचे उपमुख्‍यत्री मनीष  सिसोदिया यांना अटक केली होती.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news