file photo
file photo

कमालपूर बंधार्‍यावरून दीपकला फेकले नदीत, भोकर प्रकरणाला मिळाले वेगळे वळण

श्रीरामपूर, पुढारी वृत्तसेवा: श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथून अपहरण झालेल्या दीपक बर्डे या तरूणाचा खून केल्याची कबुली आरोपींनी दिली असल्याने, आता या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. याबाबत पोलिसांनीही दुजोरा दिलेला आहे. परंतु, दीपक याचा मृतदेह अद्याप सापडलेला नसल्याने आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झालेला नाही. पोलिसांनी याप्रकरणी चार जणांना यापूर्वीच अटक केलेली आहे. आता पुणे येथून आणखी तिघांना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे आरोपींची संख्या सात झालेली आहे.

मजनू बबन शेख, समीर अहमद शेख, इम्रान अब्बास शेख, अजिम बबन शेख, राजू बबन शेख (सर्व रा. खोकर ता. श्रीरामपूर) सोनू शेख (रा. टाकळीभान ता. श्रीरामपूर), रमजान रफीक शेख (वाघोली, पुणे) असे आरोपींची नावे आहेत. या आरोपींनी 14 सप्टेंबर रोजी दीपक बर्डे या तरूणाचे खोकर येथून अपहरण केले होते. यानंतर त्यास जबर मारहाण करून कमालपूर बंधार्‍यावरून गोदावरी नदीपात्रात फेकून दिले. तशी आरोपींनी कबुली दिलेली आहे. दीपक याचा शोध घेण्यासाठी या ठिकाणी दोन बोटींना पाचारण केलेले आहे. या बोटींद्वारे पोलिस दीपक याचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.

logo
Pudhari News
pudhari.news