Deep Breathing : टेन्‍शन फ्री राहायचे आहे; मग दीर्घ श्वसनाचे फायदे जाणून घ्‍या…

Deep Breathing : टेन्‍शन फ्री राहायचे आहे; मग दीर्घ श्वसनाचे फायदे जाणून घ्‍या…

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : बदलत्‍या जीवनशैलीमुळे प्रत्‍येकाच्‍या जगण्‍यातील ताणतणाव मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. शाळेतील मुलांपासून वृध्दांपर्यत सर्व वयोगटात वेगवेगळ्या कारणां‍मुळे तणाव (टेन्‍शन) जाणवतो. याचा मोठा दुष्‍परिणाम नकळत आपल्‍या मानसिक व शारीरिक आरोग्‍यावर होत असतो. कारण हा छुपा तणाव हा अनेक आजारांना निमंत्रण देतो. त्‍यामुळे बदललेल्‍या जीवनशैलीनुसार आपल्‍या जगण्‍यातही काही बदल करणे अपरिहार्य ठरते. तुम्‍हाला माहित आहे का, निरोगी जगण्‍यासाठी श्वसन योग्य प्रकारे होणेही अत्‍यंत महत्त्वाचे आहे. तसेच ( Deep Breathing) दीर्घ श्वसनाचा तणावमुक्तीसाठी फायदा होतो. जाणून घेवूया हे फायदे कोणते आहेत याविषयी…

एखाद्या व्यक्तीला जेव्हा खूप राग येतो, तो थकलेला असतो किंवा घाबरलेला असतो तेव्हा त्याचे स्नायू कडक होतात. त्‍याच्‍याकडून न कळतच अपुरा श्वास घेतला जातो. म्‍हणजे श्‍वसन जलद होतो. त्यामुळे शरीराला आवश्यक तेवढा ऑक्सिजन पुरेशा प्रमाणात मिळत नाही. दीर्घ श्वसनामुळे काही मिनिटांमध्‍येच शरीर आणि मन शांत होण्‍यास मदत होते. योगासने आणि प्राणायाम आपल्‍याला निरोगी जगण्‍याचे मंत्र देतात. आपण जर आपल्‍या जीवनशैलीत याचा समावेश केला तर अनेक फायदे होतात हे आता अनेक संशोधनांमधून सिद्‍ध झाले आहे.

Deep Breathing : दीर्घ श्वसन कसे करावे?

सुखासन किंवा तुम्‍हाला आराम वाटेल असे बसा किंवा झोपावे. नाकाने हळूहळू श्वास घ्‍या. एक लक्षात ठेवा जेव्‍हा तुम्‍ही श्‍वास घ्‍याल तेव्‍हा तुमचे पोट हवेने भरले पाहिजे. यानंतर नाकाने हळूहळू श्वास बाहेर सोडावा. ही क्रिया करताना एक हात पोटावर आणि दुसरा हात छातीवर ठेवा. हळूहळू श्वास घेत पोटात हवा भरा. ही क्रिया जाणवू द्या. सर्वात महत्त्‍वाचे म्‍हणजे श्वास सोडताना पोट खाली जाते, त्याचीही जाणीव झाली पाहिजे. जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा पोटावरील हात हा छातीवरील हाताच्या तुलनेत अधिक वर येतो.  ( श्वास सोडताना पोट आत, श्‍वास घेताना पोट बाहेर हे सूत्र दीर्घश्‍वसन करताना नेहमी लक्षात ठेवा ) तसेच किमान सलग दहा मिनिटे तरी दीर्घश्‍वसन करा.

दीर्घ श्‍वसनाचे फायदे

१) रोज काही मिनिटे दीर्घ श्वसन केल्यास तणाव दूर होण्यास मदत होते.

२) मन आणि शरीरालाही आराम मिळतो. त्यामुळेच झोपही चागली लागते.

३) दीर्घ श्‍वसनामुळे एंडोमॉर्फिन हे हार्मोन मुक्त होते. हे हार्मोन शरीरातील नैसर्गिक वेदनाशामक म्हणून काम करते. दीर्घ श्‍वसन करण्‍यात सातत्‍य ठेवल्‍यास हे हार्मोन मुक्‍त होते. शरीरातील नैसर्गिक वेदनाशामन प्रक्रिया वाढण्‍यास मदत होते

४) दीर्घ श्वसनामुळे शरीरातील विषारी घटक काढून टाकण्यास मदत होते.

५) रक्ताभिसरण वाढल्यामुळे व्यक्तीच्या रक्तामध्ये जास्त ऑक्सिजनचा पुरवठा होतो. ऑक्सिजन वाढल्याने ऊर्जेच्या पातळीतही वाढ होते.

६) तणावामुळे शरीरातील आम्लाच्या प्रमाणातही वाढ होते. दीर्घ श्वसन केल्याने शरीरातील आम्लता कमी होते. दीर्घ श्वास घेतल्याने तणावही कमी होतो. त्यामुळे पित्तप्रकोप होण्याचे प्रमाणही कमी होते.

७) कार्बन डायऑक्साईड हे नैसर्गिक विषारी टाकाऊ घटक असतात. दीर्घश्‍वसनामधून हे विषारी घटक शरीराबाहेर टाकले जातात.

८) दीर्घ श्वसनामुळे शरीरातील सर्वच अवयवांना जास्त ऑक्सिजनचा पुरवठा होतो. त्यामुळे शरीरातील अवयवांचे कार्य चांगल्या प्रकारे होते.

९) नियमित व्यायामामध्ये दीर्घ श्वसनाचा समावेश केल्यास शरीर आणि मन दोन्हीही तंदुरुस्त राहण्यास मदत होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news