कोल्हापूर : केंद्र शासनाच्या पंतप्रधान सुरक्षित मातृत्व अभियान योजनेचे चांगले परिणाम जिल्ह्यात दिसून येत आहेत. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे जिल्ह्यातील बालमृत्यूंची संख्या घटली आहे.
गर्भवतींचे आरोग्य चांगले राहावे आणि त्यांना सकस आहार मिळावा, यासाठी गेल्या सात वर्षांपासून ही योजना राबविण्यात येत आहे. त्याचा फायदा जिल्ह्यात झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. गतसाली जिल्ह्यात 430 बालकांचा विविध कारणांनी मृत्यू झाला. त्या तुलनेत यंदा बालमृत्यूंची संख्या 240 आहे. आरोग्य विभागाची ही अधिकृत आकडेवारी आहे.
गर्भवती आणि माता कुपोषित राहिल्याने त्यांच्या आणि बालकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतात. अनेक महिलांना गरोदरपणात मजुरी करावी लागते. शारीरिक क्षमता नसतानाही त्यांना मजुरीला जावे लागते. या महिला कुपोषित राहतात. त्यामुळे त्यांच्या बालकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतात. त्यामुळे अनेकदा माता आणि बालमृत्यू होतात.
प्राथमिक आरोग्य केंद्रे व आरोग्य उपकेंद्रावर गर्भवतींना मिळणार्या सुविधा आणि आशा कर्मचार्यांची धडपड सार्थकी लागत असल्याने जिल्ह्यातील शून्य ते पाच वयोगटातील बालकांची 'लाईफ लाईन' वाढली आहे. गेल्या सात वर्षांत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने राबविलेल्या सुविधांमुळे बालमृत्यूच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली आहे. गेल्या काही वर्षात जिल्ह्याच्या आरोग्य सेवेत आमूलाग्र बदल होत गेले. विशेषतः बालमृत्यूबाबत आरोग्य यंत्रणा दक्ष राहिल्याचे दिसून येते.
केंद्राच्या योजनेला प्रतिसाद
माता आणि बालकांचे आरोग्य सुधारावे तसेच गर्भवती, स्तनदा मातांना सकस आहार मिळावा. यासाठी केंद्र शासनाच्या महिला व बालविकास मंत्रालयाने प्रधानमंत्री मातृवंदना योजना 1 जानेवारी 2017 पासून देशभरात सुरू केली आहे. आहारासाठी महिलांना 150 दिवसांत एक हजार, दुसर्या टप्प्यात दोन हजार आणि प्रसूतीनंतर दोन हजार रुपये दिले जात आहेत. या योजनेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.