Haryana Violence : नूहची आग गुरुग्रामपर्यंत; मृतांची संख्या 5

Haryana Violence : नूहची आग गुरुग्रामपर्यंत; मृतांची संख्या 5
Published on
Updated on

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : हरियाणातील नूह (Haryana Violence) जिल्ह्यात उसळलेल्या हिंसाचाराची धग गुरुग्रामपर्यंत पोहोचली असून, 31 जुलैच्या रात्री उशिरा सुमारे 100 लोकांच्या जमावाने गुरुग्रामच्या सेक्टर 56-57 भागात एका बांधकाम सुरू असलेल्या धार्मिकस्थळाची तोडफोड करून जाळपोळ केली. या हिंसाचारात धार्मिकस्थळी उपस्थित असलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर एकजण जखमी झाला. पोलिस एफआयआरनुसार, मोहम्मद साद असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असून, तो बिहारचा रहिवासी आहे. त्यामुळे नूह आणि गुरुग्राममध्ये उसळलेल्या हिंसाचारातील मृतांची एकूण संख्या पाच झाली आहे. अनेक वाहने आणि दुकानेही जमावाने पेटवून दिल्याचे स्पष्ट झाले आहे.

रात्री 12.15 वाजता गुरुग्राम सेक्टर-57 मधील बूम प्लाझा येथून सुमारे 100-120 लोकांचा जमाव धार्मिक घोषणा देत आला. जमावाने प्रथम घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांवर जोरदार दगडफेक केली. यानंतर जवळच असलेल्या धार्मिकस्थळाला आग लावण्यात आली. जमावात सामील असलेल्या लोकांनी धार्मिकस्थळी घुसून गोळीबार सुरू केला. यादरम्यान आतमध्ये असलेल्या सादचा मृत्यू झाला, तर खुर्शीद आलम याच्या पायाला गोळी लागल्याने तो जखमी झाला. साद हा इमाम असल्याचे स्पष्ट झाले आहे.

नूह जिल्ह्यात शांतता (Haryana Violence)

दरम्यान, विश्व हिंदू परिषदेच्या मंडल यात्रेदरम्यान उसळलेल्या हिंसाचारानंतर नूह जिल्ह्यात तणावपूर्ण शांतता असल्याचे सांगण्यात आले. हिंसाचारात जमावाकडून अनेक वाहने आणि दुकाने पेटविण्यात आल्यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. नूहमध्ये दोन दिवसांसाठी जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या हिंसाचारात चारजण ठार, तर अनेक जण जखमी झाले होते. हे लोण अन्यत्र पसरू नये, यासाठी सर्वत्र कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. प्रामुख्याने धार्मिकस्थळांच्या ठिकाणी विशेष दक्षता घेतली जात आहे. खबरदारीचा उपाय म्हणून इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली आहे. पोलिसांनी आतापर्यंत 40 गुन्हे दाखल करून सुमारे 80 जणांना अटक केली आहे. दरम्यान, शांततेला गालबोट लावणार्‍यांविरुद्ध सरकार कठोर कारवाई करणार असल्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल वीज यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news