जिवंत व्हेलपेक्षाही मृत मासा अधिक धोकादायक!

जिवंत व्हेलपेक्षाही मृत मासा अधिक धोकादायक!

न्यूयॉर्क : एखादा मोठा मासा किंवा विचित्र समुद्री जीव समुद्रकिनारी येतो, त्यावेळी त्याला पाहण्यासाठी बर्‍याचदा मोठी गर्दी होत असते. असे हौसे-गवसे-नवसे एकवेळ जिवंत माशाला घाबरतील. पण, मेलेल्या व्हेल माशाला हात लावून फोटो काढण्यात त्यांना मोठी धन्यता वाटत असते. पण, असे करणे किती धोकादायक असते, याची त्यांना क्वचितच कल्पना असते. आता मृत माशापासून असा काय तो धोका, असा प्रश्न मनात येणे साहजिकच आहे. त्यात काहीही गैर नाही. पण, वस्तुस्थिती अतिशय वेगळी आहे आणि जिवंत व्हेलपेक्षाही मृत मासा अधिक धोकादायक असतो, असे एका निरीक्षणात आढळून आले आहे.

याचे कारण असे की, व्हेलच्या शरीराचा कधीही स्फोट होऊ शकतो, ज्यामुळे तो मानवांसाठी नेहमीच धोका असतो. मृत व्हेलच्या शरीराचा स्फोट का होतो, याचेही कारण थक्क करणारे आहे. मृत्यूनंतर जीवाणू त्यांच्या शरीराचे अंतर्गत भाग खाण्यास सुरुवात करतात. त्यामुळे त्यांच्या शरीरात अनेक प्रकारचे वायू तयार होतात, त्या वायूंमुळे त्यांच्या शरीराला सूज येऊ लागते. ही प्रक्रिया व्हेलच्या शरीरात मोठ्या प्रमाणात होते; परंतु त्याच्या शरीराचा बाह्य स्तर खूप मजबूत असतो, ज्यामुळे वायू त्याच्या शरीरातून बाहेर पडू शकत नाही आणि जेव्हा जास्त वायू तयार होतो तेव्हा त्यांचे शरीर फुटते.

अनेक वेळा व्हेलचे शरीर फुटू नये म्हणून त्याचे शरीर कापले जाते. मात्र, कधी कधी कापल्यानंतर ही त्याचे शरीर फुटते आणि त्याचे मांस बाहेर येऊन कित्येक मीटर दूर पसरते. त्यामुळे अनेक गोष्टी लक्षात ठेवल्या जातात. त्याच वेळी, व्हेलच्या मृत शरीरात तयार होणारा वायू मानवांना देखील हानी पोहोचवू शकतो. व्हेलच नव्हे, तर हत्ती आणि गेंड्यासारख्या प्राण्यांच्या बाबतीत देखील असेच होते, असे आढळून आले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news