पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने (David Warner) एक मोठी कामगिरी आपल्या नावावर केली आहे. तो विश्वचषकाच्या इतिहासात ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. वॉर्नरने विश्वचषक 2023 च्या 18व्या साखळी सामन्यात पाकिस्तानविरुद्ध हा पराक्रम केला. त्याने संघाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज अॅडम गिलख्रिस्टचाही विक्रम मोडीत काढला.
डावखुरा फलंदाज वॉर्नरने (David Warner) एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात 22 सामन्यांच्या 22 डावांमध्ये 1100 धावांचा टप्पा पार केला. अशी कामगिरी करणारा तो ऑस्ट्रेलियाचा दुसरा फलंदाज आहे. फक्त रिकी पाँटिंग त्याच्या पुढे आहे. पाँटिंगच्या नावावर 1743 धावा आहेत. तर डेव्हिड वॉर्नरने 1127 धावा केल्या आहेत (जेव्हा तो 64 धावांवर नाबाद होता). या यादीत अॅडम गिलख्रिस्ट आता तिसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. त्याच्या नावावर 1085 धावा आहेत.
रिकी पाँटिंग : 1743 धावा
डेव्हिड वॉर्नर : 1100* धावा (फलंदाजी अजूनही सुरू आहे)
अॅडम गिलख्रिस्ट : 1085 धावा
मार्क वॉ : 1004 धावा
मॅथ्यू हेडन : 987 धावा
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात 38 धावा केल्यानंतर वॉर्नरने (David Warner) वनडे करिअरमधील 6,500 धावा पूर्ण केल्या. हा आकडा गाठणारा तो ऑस्ट्रेलियाचा 8वा फलंदाज ठरला आहे. या यादीत रिकी पाँटिंग (13,589) पहिल्या स्थानावर आहे. तर गिलख्रिस्ट (9,595) दुसऱ्या, मार्क वॉ (8,500) तिसऱ्या, मायकेल क्लार्क (7,981) चौथ्या, स्टीव्ह वॉ (7,569) पाचव्या, मायकेल बेवन (6,912) सहाव्या आणि अॅलन बॉर्डर आहे (6,524) 7व्या स्थानावर आहेत.
एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत 1100 धावांचा टप्पा पार करणारा वॉर्नर हा 12वा खेळाडू आहे. या यादीत सर्वाधिक नावे भारतीय खेळाडूंची आहेत. तीन भारतीय खेळाडूंनी हा पराक्रम केला असून त्यात सचिन, विराट आणि रोहित शर्माच्या नावांचा समावेश आहे.