पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज डेव्हिड वॉर्नर (David Warner) याने एकदिवसीय (वन-डे) क्रिकेटमधून (ODI retirement) निवृत्तीची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे, सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर 3 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या पाकिस्तानविरुद्धच्या निरोपाच्या कसोटी सामना खेळण्यापूर्वीच वॉर्नरने वन-डे क्रिकेटमधूनही निवृत्ती जाहीर केली आहे. (David Warner announces ODI retirement )
पत्रकार परिषदेत डेव्हिड वॉर्नर म्हणाला की, "2023 च्या विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने चॅम्पियन म्हणून ५० षटकांच्या फॉर्मेटमधून निवृत्ती घेण्याचा विचार केला होता.पत्नी कँडिस आणि त्यांच्या तीन मुली, आयव्ही, इस्ला आणि इंडी यांच्यासाठी अधिक वेळ देणे आवश्यक आहे."
मला आता माझ्या कुटुंबीयांसोबत वेळ घालवायचा आहे. २०२३ मध्ये भारतात झालेल्या विश्वचषक स्पर्धा जिंकणे ही ऑस्ट्रेलिया संघाची मोठी कामगिरी होती.
पुढील वर्षी म्हणजे २०२५ मध्ये पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी होणार आहे. मी दोन वर्षांच्या कालावधीत क्रिकेट खेळत राहिलो आणि चॅम्पियन्स ट्रॉफीवेळी ऑस्ट्रेलियाच्या संघास सलामीवीराची आवश्यकता असेल तर मी वन-डे क्रिकेटमधून निवृत्ती मागे घेईन, असेही वॉर्नर याने यावेळी जाहीर केले.
वॉर्नरने विश्वचषक २०२३ स्पर्धेत दमदार फलंदाजीचे प्रदर्शन केले. तो ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक धावा करणार्या खेळाडूंपैकी एक ठरला. विश्वचषक स्पर्धेतील ११ सामन्यात त्याने ४८.६३ च्या सरासरीने ५३५ धावा केल्या. यामध्ये दोन शतके आणि एक अर्धशतकाचा समावेश आहे. या स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध त्याने १६३ धावांची खेळी केली होती.
ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याने २००९ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होबार्टमध्ये पदार्पण केले होते. आपल्या वन-डे क्रिकेट कारकीर्दीत एकूण १६१ सामने खेळले. त्याने २२ शतके आणि ३३ अर्धशतके झळकावली. ४५.३० च्या सरासरीने आणि ९७.२६ स्ट्राइक रेटने ६,९३२ धावा त्याच्या नावावर आहेत. वन-डे क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक धावा करणार्या फलंदाजांमध्ये तो सहाव्या क्रमाकांवर आहे. रिकी पाँटिंग, अॅडम गिलख्रिस्ट, मार्क वॉ, मायकेल क्लार्क आणि स्टीव्ह वॉ यांच्यानंतर सर्वाधिक धावा करणारा ऑस्ट्रेलियन फलंदाज अशी डेव्हिड वॉर्नरची ओळख आहे.
हेही वाचा :