सुखद घटना! वडिलोपार्जित जमिनीत सुनांना दिला वाटा; इंदापूरातील लोकअदालतीत घडली किमया

सुखद घटना! वडिलोपार्जित जमिनीत सुनांना दिला वाटा; इंदापूरातील लोकअदालतीत घडली किमया

इंदापूर; पुढारी वृत्तसेवा : सध्याच्या काळात सुनेवर अत्याचार घडल्याच्या घटना सर्वत्रच ऐकायला, पाहायला मिळतात. मात्र, स्त्रियांच्या बाबतीत नीतिमूल्ये हरपत आणि पुरुषप्रधान संस्कृतीच्या नावाखाली भारतीय संस्कृतीपासून भरकटत चाललेल्या समाजापुढे आदर्श ठरावे, अशी सुखद घटना मराडेवाडी येथील मराडे कुटुंबीयांत घडली. आपल्या वडिलोपार्जित जमिनीमध्ये चक्क दोन्ही सुनांना वाटा देऊन कुटुंबप्रमुख सुभाष मराडे यांनी हा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. अ‍ॅड. अरुण गायकवाड आणि अ‍ॅड. महेश शिंदे यांच्या प्रयत्नांती ही किमया इंदापूर न्यायालयातील लोकन्यायालयात घडली.

विधी सेवा समितीचे अध्यक्ष न्यायाधीश पी. एल. पाटील, न्यायाधीश खाजा कलाल, न्यायाधीश स्वानंदी वडगावकर, न्यायाधीश शीतल साळुंखे व इंदापूर वकील संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. नरेंद्र शहा यांच्या उपस्थितीत लोकअदालत पार पडली. यामध्ये अनेक घटना तडजोडीअंती निकाली काढण्यात आल्या. परंतु यामध्ये वरील घटना उल्लेखनीय ठरली.

सुभाष मराडे यांनी आपल्या कुटुंबीयांच्या सहमतीने सोनाली सदाशिव मराडे आणि सिंधू भाऊ मराडे या दोन्ही सुनांना आपल्या वडिलोपार्जित जमिनीमध्ये वाटा दिला आहे. जिथे मुली आणि बहिणींचा हक्क सोडपत्राद्वारे अधिकार मारला जातो, तिथे सुनांना वाटा देऊन हक्क देणारे मराडे कुटुंबीय भविष्यात अनेकांसाठी आदर्श ठरणार आहेत.

अत्यंत यशस्वी ठरलेल्या या लोकन्यायालयासाठी पॅनेल सदस्य म्हणून अ‍ॅड. रुद्राक्ष मेणसे, अ‍ॅड. अनंत जाधव यांनी काम पाहिले. तर, इंदापूर वकील संघटनेचे उपाध्यक्ष धैर्यशील नलवडे व अ‍ॅड. अनिल पारेकर, सचिव अ‍ॅड. आसिफ बागवान, खजिनदार संकेत नगर, ग्रंथपाल वैजीनाथ गायकवाड, अ‍ॅड. के. डी. यादव, अ‍ॅड. रणजित चौधरी, रवींद्र कोकरे, किरण धापटे, अ‍ॅड. विनोद पारेकर, अ‍ॅड. शरद घोगरे, अ‍ॅड. अजिंक्य धारुरकर, न्यायालयातील कर्मचारी प्रतीक चिंचकर आणि सर्व कर्मचारी या घटनेचे साक्षीदार ठरले.

172 प्रकरणे तडजोडीने निकाली

इंदापुरातील लोकअदालतीमध्ये एकूण 952 प्रकरणे ठेवण्यात आली होती. ज्यामध्ये बँकांचे थकीत कर्ज, विभक्त राहणारी विवाहित जोडपी, गहाण खत प्रकरणे, भावकीतील वाद आणि वीजबिलासंदर्भातील प्रकरणांचा समावेश होता. पैकी 172 प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली. विशेष म्हणजे या लोकन्यायालयामध्ये तब्बल 43 लाख 49 हजार 998 एवढी रक्कम वसूल झाली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news