Suhani Bhatnagar DERMATOMYOSITIS : ‘दंगल गर्ल’ सुहानीचा ‘डर्माटोमायोसिटिस’मुळे मृत्‍यू, जाणून घ्या आजाराची लक्षणे आणि उपचार

Suhani Bhatnagar DERMATOMYOSITIS : ‘दंगल गर्ल’ सुहानीचा ‘डर्माटोमायोसिटिस’मुळे मृत्‍यू,  जाणून घ्या आजाराची लक्षणे आणि उपचार

पुढारी ऑनलाईन डेस्क : १९ वर्षीय अभिनेत्री सुहानी भटनागर (Suhani Bhatnagar) हिचे शुक्रवारी (दि. १६ फेब्रुवारी) निधन झाले. ती अवघी १९ वर्षांची  हाेती.  तिने 'दंगल' चित्रपटात आमिर खानची लहान मुलगी ज्युनियर बबिता फोगटची भूमिका साकारली हाेती. दोन महिन्यांपूर्वी सुहानीला एक दुर्मिळ आजार झाल्याची माहिती आई-वडिलांना मिळाली होती. डर्माटोमायोसिटिस (DERMATOMYOSITIS) असे नाव या आजाराचे आहे. या दुर्मिळ आजाराशी सुहानीची झुंज काल अपयशी ठरली.

सुहानीच्या (Suhani Bhatnagar) आई-वडिलांनी दिलेल्या माहिती म्हणण्यानुसार, दोन महिन्यांपूर्वी तिच्या डाव्या हाताला सूज आली होती. हळूहळू ती सूज एका हातातून दुसऱ्या हातापर्यंत आणि नंतर संपूर्ण शरीरात पसरू लागली. त्यामुळे एम्समध्ये (AIMS) तपासणीकरिता दाखल करण्यात आले. या तपासणीनंतर असे आढळून आले की, ती डर्माटोमायोसिटिस (DERMATOMYOSITIS) डिसीज नावाच्या गंभीर आजाराने ग्रस्त होती, ज्यामुळे तिच्या स्नायूंवर परिणाम होऊ लागला.

डर्माटोमायोसिटिस म्हणजे काय?

डर्माटोमायोसिटिस एक स्वयंप्रतिकार विकार आहे. या आजाराचा परिणाम त्वचा आणि स्नायूंवर होतो. त्याशिवाय रक्तवाहिन्यांवरही परिणाम होतो. या स्थितीमुळे स्नायू कमकुवत होतात आणि त्वचेवर पुरळ उठते. पुरुषांपेक्षा महिलांमध्ये या आजाराचे प्रमाण जास्त आहे.

डर्माटोमायोसिटिसची कारणे

या आजाराचे ठोस कारण काय हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. हा जनुकांमधून येतो की, वातावरणातून की दोन्हीकडून? याबाबत संभ्रम आहे. हा आजार बहुतांशी स्वयंप्रतिकार विकारासारखा आहे. यामध्ये ग्रस्त व्यक्तीचे शरीर स्वतःच्याच ऊतींना शत्रू मानते आणि त्यावर हल्ला करते. यामुळे पीडित रुग्णाला याचा त्रास होऊ लागतो.

डर्माटोमायोसिटिस लक्षणे

चेहरा, पापण्या, नखे, पोर, कोपर, गुडघे, छाती आणि पाठीच्या आजूबाजूच्या भागात गडद लाल पुरळ ही डर्माटोमायोसिटिसची मुख्य लक्षणे आहेत. त्वचेतील बदल आणि स्नायू कमजोर होणे ही दोन मोठी कारणे या आजाराची आहेत. चेहरा, मान, खांदे आणि छातीवर लाल पुरळ उठणे हे या आजाराचे पहिले लक्षण आहे. पुरळांमुळे वेदना आणि खाज सुटू शकते. याशिवाय कमरेखालचा भाग, मांड्या आणि मानेच्या स्नायूंमध्ये कमजोरी यांसारखी लक्षणे यामध्ये आढळून येतात.

डर्माटोमायोसिटिसमुळे ही परिस्थिती उद्भवू शकते

  1. थंड पाण्याच्या संपर्कात आल्यावर बोटे, गाल, नाक आणि कान पिवळे होऊ शकतात.
  2. या आजारामुळे हृदयाच्या स्नायूमध्ये सूज येऊ शकते.
  3. इंटरस्टिशियल फुफ्फुसांची स्थिती विकसित होऊ शकते. यामध्ये फुफ्फुसे कडक आणि लवचिक बनतात.
  4. स्त्रियांमध्ये हा आजार गर्भाशयाच्या कर्करोगाशी संबंधित आहे.

इतर काही लक्षणे

  1. वजन कमी होणे
  2. ताप
  3. सुजलेली फुफ्फुसे

डर्माटोमायोसिटिस आजाराचा परिणाम कोणत्या वयोगटावर?

  1. 5 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांवर परिणाम
  2.  40 ते 60 वयोगटातील प्रौढ
  3. महिला

डर्माटोमायोसिटिसचा उपचार

डर्माटोमायोसिटिसवर या आजारावर अद्याप कोणताही ठोस इलाज नाही, परंतु या आजाराची लक्षणे सुधारण्याची शक्यता आहे. त्यामुळे  या रुग्णांना डॉक्टर सर्वातप्रथम औषधोपचार घेण्याचा सल्ला देतात. म्हणून, लक्षणे दिसू लागताच, आपण ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news