चक्रीवादळ आज शमणार; उष्णतेची तीव्रता घटणार

चक्रीवादळ आज शमणार; उष्णतेची तीव्रता घटणार

पुणे : पुढारी वृत्तसेवा : बंगालच्या उपसागरातील मोखा या महाचक्रीवादळाचे रविवारी सायंकाळी 6 च्या सुमारास म्यानमारला लँड फॉल (जमिनीवर) झाले. त्यामुळे त्याचा वेग कमी होण्यास सुरुवात झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून आता महाराष्ट्रासह देशभरातील उष्णतेची तीव्रता 17 मेनंतर कमी होण्यास सुरुवात होऊ शकते. तसेच मान्सून वेळेवर येईल, असा अंदाज हवामानशास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.
गेले चार ते पाच दिवस संपूर्ण देशात उष्णतेच्या लाटेने कहर केला आहे.

त्यातही विदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रात तापमान 45 अंशांवर गेल्याने हाहाकार आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या मोखा या चक्रीवादळाने उपसागर ढवळून काढला, त्याचा वेग प्रचंड होता. या वादळाने हवेतील आर्द्रता कमी झाल्याने अवकाळी पावसाला ब्रेक लागला अन् उष्णतेची लाट अधिकच तीव्र झाली. सोमवारी हे वादळ शांत होत आहे. त्याचा फायदा मान्सूनसाठी होईल व तो वेळेवर येण्याचे संकेत आहेत.

1982 नंतरचे चौथे वेगवान वादळ
बंगालच्या उपसागराकडून मोखा चक्रीवादळ रविवारी (दि. 14 मे) म्यानमार व बांगलादेशच्या दिशेने निघाले. रविवारी सकाळी त्याचा वेग ताशी 220 पेक्षा जास्त होता. मात्र, सायंकाळी 6 वाजता ते म्यानमारला जमिनीवर आल्याने उद्या सोमवारी (दि. 15 मे) त्याचा वेग 80 ते 50 किलोमीटर होऊन ते शमणार आहे. यंदाच्या वर्षातील मोखा हे पहिले चक्रीवादळ असून, ते 1982 नंतर चौथे वेगवान वादळ ठरले आहे. 2019 मध्ये फना, 2020 मध्ये अम्फान (145), तर 2007 मध्ये आलेले मोचा ही वादळे वेगवान ठरली होती. मोखा हे या पंक्तीत जाऊन बसले आहे.

रविवारचे राज्याचे तापमान…
अकोला 45.6, जळगाव 45, अमरावती 44.6, परभणी 44.7, वर्धा 44.1, सोलापूर 43.3, यवतमाळ 43, बीड 43, नागपूर 42.7, मुंबई 34, छत्रपती संभाजीनगर 41.8, पुणे 38, कोल्हापूर 35.1, नगर 41.1, नाशिक 38.1, सांगली 37.6, सातारा 37.7.

मोखा चक्रीवादळामुळे मान्सूनला गती मिळेल, अशी चिन्हे दिसत आहेत. कारण, अवकाळी पाऊस थांबत नव्हता. तो चक्रीवादळामुळे थांबला. त्यामुळे उन्हाचा कडाका पाहिजे तेवढा वाढला.
                                     – डॉ. रामचंद्र साबळे, ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ, पुणे

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news