Cyclone Mocha | ‘मोचा’ चक्रीवादळ आज उग्र रूप धारण करणार, ‘या’ भागांत यलो अलर्ट जारी

Cyclone Mocha
Cyclone Mocha

पुढारी ऑनलाईन : बंगालच्या उपसागरातील आग्नेय भागात आजपासून (दि.१०) 'मोचा' हे चक्रीवादळ उग्र रूप धारण करून, त्याचे तीव्र वादळात रूपांतर होऊ शकते. दरम्यान बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टीवर ताशी ६० ते ७० किमी वेगाने वारे वाहणार आहे. यामुळे किनारपट्टीच्या भागात यलो अलर्ट देण्यात आला असून, तापमान वाढून अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.

आयएमडीने म्हटले आहे की, बंगालच्या उपसागराच्या आग्नेय भागात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र आज चक्रीवादळाचे रूप धारण करू शकते. यामुळे भारतातील अनेक सभागात पावसाची शक्यता आहे. परंतु नुकसान होण्याचा धोका कमी आहे, कारण ते १२ मे पर्यंत हे मोचा चक्रिवादळ उत्तर-वायव्य दिशेने सरकेल आणि नंतर बांगलादेश आणि म्यानमारच्या दिशेने जाईल, असे देखील हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

बंगालच्या उपसागरात निर्माण होत असलेल्या या चक्रीवादळामुळे येत्या काही दिवसांत दिवसाचे तापमान वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान IMD ने पुढील दोन दिवस किनारपट्टीलगचती शहरे आणि उपनगरात कमाल ३६ ते ३७ अंश सेल्सिअस आणि किमान २६ ते २७ अंश सेल्सिअस तापमान वाढीचा अंदाज वर्तवला आहे. आकाश अंशतः ढगाळ असले तरी काही भागात गडगडाटी वादळे आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आयएमडीकडून वर्तवण्यात आली आहे.

Cyclone Mocha : काही भागात जोरदार पावसाचा इशारा

मोचा चक्रीवादळामुळे बंगालच्या खाडीत ११ मे पर्यंत जोरदार पाऊस पडणार असल्याची शक्यता आहे. तर आंध्र प्रदेशमध्ये आद्रता नष्ट होऊन, उष्णता वाढण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. चेन्नईमध्ये देखील तापमानात वाढ होऊन, विजांच्या कडकडाटांसह वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

मंगळवारी (दि.०९) रात्री उशिरापासून बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे अंदमान आणि निकोबार बेट प्रशासनाने लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. कमी दाबाचे क्षेत्र आता आग्नेय बंगालचा उपसागर आणि दक्षिण अंदमान समुद्राला लागून आहे. बुधवारी (दि.१०) हे कमी दाबाचे क्षेत्र आणखी तिव्र होऊन त्याचे चक्रीवादळ 'मोचा' मध्ये रूपांतर होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे किनारपट्टीवरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मच्छिमारांसाठी सूचना जारी

मच्छीमार आणि लहान जहाजे, बोटी आणि ट्रॉलरच्या चालकांना मंगळवारपासून आग्नेय आणि लगतच्या मध्य बंगालच्या उपसागरात जाऊ नये, असे हवामान खात्याने सांगितले आहे. पूर्व-मध्य बंगालचा उपसागर आणि उत्तर अंदमान समुद्राच्या पलीकडे असणाऱ्यांनाही हवामान खात्याने आज दिवसभरात परतण्यास सांगितले आहे.

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news