गांधीनगर, वृत्तसंस्था : गुजरातच्या कच्छ आणि सौैराष्ट्रात धुमाकूळ घालणार्या बिपरजॉय चक्रीवादळात आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. राज्यातील सुमारे एक हजार गावांतील वीजपुरवठा बंद असून 700 हून झाडे उन्मळून पडली आहेत. शिवाय पडझडीच्याही अनेक घटना घडल्या आहेत. या चक्रीवादळाची गती कमी झाली असून ते आता राजस्थानपर्यंत पोहोचले आहे. सध्या गुजरात आणि राजस्थानात जोरदार वार्यांसह अतिमुसळधार पावसाचे थैमान सुरू आहे.
गुरुवारी रात्री 9 च्या सुमारास जाखाऊ बंदरानजीक बिपरजॉय चक्रीवादळाने जमिनीला स्पर्श केला आणि 140 कि.मी. वेगाचे वारे वाहत हे चक्रीवादळ पुढे सरकत गेले. या चक्रीवादळ एवढे महाकाय होते की, वादळाच्या चक्राचा शेवटचा भाग जमिनीवर धडकेपर्यंत रात्रीचे दोन वाजले. वादळी वार्यांसह बेभान कोसळणार्या पावसानेही झोडपायला सुरुवात केली. समुद्राला मिळणार्या अनेक छोट्या-मोठ्या नदी-नाल्यांत खवळलेल्या समुद्राचे पाणी शिरल्याने सगळीकडे पाण्याने पात्राबाहेर येत गावे व शहरांत महापुराची स्थिती आणली. मांडवीसारख्या नदीच्या पाण्याचा फुगवटा एवढा वाढला की, लगतच्या गावांत पाणी घुसले व अनेक घरे पाण्याखाली गेली. दोन ते चार मीटरच्या लाटांनी समुद्र भूभागाला झोडपून काढत होता.
जसजसे वादळ पुढे सरकत गेले तसे जागोजाग शेकडो झाडे उखडून फेकली गेली. अनेक खांब कोलमडले, घरांवरचे पत्रे उडाले, कच्ची बांधकामे कोसळली. शुक्रवारी सायंकाळपर्यंत गुजरातेत 700 हून अधिक झाडे कोसळल्याचे सांगण्यात आले तर 5 हजारच्या आसपास विजेचे खांब कोलमडले अथवा वाकले. अनेक शहरांत जाहीरातींचे होर्डिंग्ज उडून आसपासच्या इमारतींवर कोसळले. अशा घटनांत जखमी होणार्यांची संख्या मोठी आहे.
बापलेकाचा मृत्यू
भावनगर जिल्ह्यात ओढ्याच्या पुरात अडकलेल्या आपल्या शेळ्या-मेंढ्या वाचवण्यासाठी पितापुत्र जोरदार वादळातही पाण्यात घुसले. त्यांनी काही शेळ्या बाहेरही काढल्या. पण त्यानंतर आलेल्या एका जोरदार लोंढ्यात ते वाहून गेले व त्यांचा मृत्यू झाला.
सर्वाधिक फटका कच्छला
पूर्ण वेगात आदळलेल्या या चक्रीवादळाने कच्छला सर्वाधिक फटका दिला. गुजरातमध्ये झालेल्या एकूण हानीपैकी 40 टक्के हानी कच्छमध्येच झाल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. त्या खालोखाल सौराष्ट्राला वादळाचा मोठा फटका बसला.