Cybercrime Nashik : कमिशनच्या मोबदल्यात बँक खात्यांचा वापर

Cybercrime Nashik : कमिशनच्या मोबदल्यात बँक खात्यांचा वापर

Published on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिकमधील एका प्रसिद्ध व्यावसायिकास शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने भामट्यांनी तीन कोटींची फसवणूक केली. या भामट्यांनी अवघ्या तीन तासांत देशभरातील शंभरहून अधिक बँक खात्यात ३ कोटी रुपये वर्ग केले. बँक खातेधारकांना १० ते २० टक्के कमिशन देण्याचे आमिष दाखवून भामट्यांनी बँक खात्यांचा वापर केल्याचे पोलिस तपासात उघड झाले. याप्रकरणी सायबर पोलिसांनी वसईतून एका बँक खातेधारक तरुणास अटक केली आहे. (Cybercrime)

शहरात वाहन विक्रीचे शो-रूम असलेल्या एका व्यावसायिकास भामट्यांनी ऑनलाइन गंडा घातला. व्यावसायिकास संपर्क साधून भामट्यांनी त्यांना शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्यास प्रवृत्त केले. पैसे आल्यानंतर भामट्यांनी संपर्क तोडला. त्यामुळे या भामट्यांसह ज्यांच्या बँक खात्यात पैसे वर्ग झाले त्या बँक खातेधारकांविरोधात सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल (Cybercrime) करून तपास सुरू केला आहे. त्यानुसार पोलिसांच्या तपासात व्यापाऱ्याकडून आलेले पैसे भामट्यांनी तीन तासांत देशभरातील शंभरहून अधिक बँक खात्यांमध्ये वर्ग केले. त्यापैकी संशयित बबलू ठाकूर (२४, रा. वसई) या बँक खातेधारकास सायबर पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयाने २ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. (Cybercrime)

तीन कोटी रुपयांपैकी वीस लाख रुपये संशयित बबलूच्या बँक खात्यात जमा झाले होते. बबलूने दिलेल्या कबुलीनुसार जमा झालेले पैसे काढून त्याने दुसऱ्या संशयितास रोख स्वरूपात दिले. हे पैसे बँक खात्यात घेऊन ते काढून देण्याच्या मोबदल्यात संशयिताने बबलूला वीस हजार रुपयांचे 'कमिशन' दिल्याचेही उघड झाले. त्यामुळे कमिशनच्या मोबदल्यात भामट्यांनी नागरिकांचे बँक खाते वापरण्याचा फंडा अवलंबल्याचे उघड होत आहे. त्यामुळे भामट्यांनी देशभरात पैशांचे व्यवहार करण्यासाठी नेटवर्क उभारल्याचे चित्र आहे.

बबलूचे अनेक कारनामे उघड
संशयित बबलू हा वसई येथील एका फर्निचर दुकानात काम करतो. त्याचे बारावीपर्यंत शिक्षण झाले आहे. काही दिवसांपूर्वी एक संशयित बबलूला भेटला व 'तुझ्या बँक खात्यात पैसे टाकले तर चालतील का? ते पैसे काढून मला रोख स्वरूपात दिल्यास मी तुला त्या मोबदल्यात कमिशन देईल' असे सांगितले. बबलूने होकार दिल्यानंतर व्यवहार झाल्याचे समोर आले आहे. बबलू याने आतापर्यंत खोट्या 'केवायसी'तून चार-पाच बँक खाती तयार केली आहेत. तर शेअर्स फसवणुकीच्या पैशांमधून त्यास पहिल्यांदाच 'कमिशन' मिळाल्याचे समजते.

परराज्यातील बँक खात्यांचा तपास
सायबर पोलिसांनी सखोल तपासास सुरुवात केली असून, ज्येष्ठ नागरिक, महिलांच्या नावे बँक खाती असल्याचे उघड झाले आहे. त्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर केला आहे. देशातील दिल्ली, गुजरात, हरियाणा, महाराष्ट्र, बिहार, तेलंगणा, केरळ, कर्नाटक राज्यांमध्ये ही बँक खाती आहेत. (Cybercrime)

फसवणूक केल्याप्रकरणी एका संशयितास अटक केली आहे. त्याच्या बँक खात्यातील व्यवहारांनुसार इतरांचा शोध सुरू आहे. देशभरात मोठ्या प्रमाणात या स्वरूपाची फसवणूक सुरू आहे. शक्यतो, शेअर ट्रेडिंगकरिता नागरिकांनी खबरदारी घ्यावी. अनोळखी व्यक्ती अथवा ॲप, लिंकमार्फत आर्थिक व्यवहार करू नये. – धीरज गवारे, सहायक पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news