पुढारी ऑनलाईन डेस्क : BCCI Fined Virat Kohli : आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहली आयपीएलच्या आचारसंहितेच्या कचाट्यात सापडला आहे. सीएसकेविरुद्धच्या सामन्यानंतर त्याच्या दहा टक्के मॅच फीला कात्री लावण्यात आली आहे.
बंगळूरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात कोहलीने 'कोड ऑफ कंडक्ट'चे उल्लंघन केल्याचे उघडकीस आले आहे. तो आयपीएल 'कोड ऑफ कंडक्ट'च्या आर्टिकल 2.2 च्या लेव्हल 1 मध्य दोषी ठरला आहे. त्यामुळे कोहलीवर दंडात्मक कारवाई केल्याचे बीसीसीआयने जाहीर केले आहे. कोहलीने देखील आपला गुन्हा मान्य केला आहे.
प्रथम फलंदाजी करताना सीएसकेचा शिवम दुबे आऊट झाल्यानंतर कोहलीने आक्रमक अंदाजात सेलिब्रेशन केले होते. या त्याच्या आक्रमक सेलिब्रेशनवर आक्षेप घेत त्याच्यावर कारवाई करण्यात आल्याचे समोर आले आहे. शिवम दुबेने पारनेलच्या बॉलवर सिराजच्या हातात झेल दिला होता.
या सामन्यात विराट कोहली मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. तो केवळ 6 धावा करून चेन्नईच्या आकाश सिंहच्या बॉलवर क्लिन बोल्ड झाला.
आर्टिकल 2.2 सामन्यादरम्यान क्रिकेट उपकरण किंवा कपडे, ग्राऊंड उपकरण किंवा फिटिंगच्या दुरुपयोगाविषयी आहे. याआधी याच आर्टिकलनुसार लखनऊ सुपर जायंट्सच्या आवेश खानवरही कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी आवेशने आरसीबीविरुद्ध झालेल्या सामन्यात विजय धाव काढताना हेल्टेम जमिनीवर फेकला होता.
16 एप्रिलला रोहित शर्माच्या जागेवर मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करणाऱ्या सूर्यकुमार यादववर 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला होता. आयपीएलमध्ये त्याने पहिल्यांना कर्णधारपदाची धुरा सांभाळली आहे. तसंच गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्या, राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन आणि बंगळुरुचा कर्णधार फाफ डु प्लेसिसलाही स्लो ओव्हर रेटच्या कारणास्तव १२ लाखांचा भुर्दंड लावण्यात आला होता. स्लो ओव्हर रेटशी संबंधित कोड ऑफ कंडक्टनुसार जर एखादा कर्णधार पहिल्यांदा असं करत असेल, तर त्याच्यावर 12 लाखांची दंडात्मक कारवाई करण्यात येते.
कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार नितीश राणा (Nitish Rana) मुंबई इंडियन्सविरुद्धच्या (MI) सामन्यात आयपीएलच्या आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते. त्यामुळे प्रत्येक मॅच फीच्या 25 टक्के दंड हा ठोठावला आहे. राणाला आयपीएल आचारसंहिता 2.21 अंतर्गत लेव्हल 1 वर दोषी ठरवले गेले. तर मुंबई इंडियन्सच्या हृतिक शोकीनला 10 टक्के दंड ठोठावण्यात आला होता. सामन्यादरम्यान नितीश आणि शोकीन यांच्यात वाद झाला असता. शौकीनला आयपीएल आचारसंहिता 2.5 लेव्हल वन अंतर्गत दोषी ठरवण्यात आले असते.
रविचंद्रन अश्विन हा आयपीएल आचारसंहिता 2.7 अंतर्गत दोषी ठरला होता. त्यामुळे प्रत्येक मॅच फीच्या 25 टक्के दंड ठोठावला होता. चेन्नईविरुद्धच्या सामन्यात अश्विन अंपायरच्या निर्णयावर नाराज झाला होता. सामन्यात अंपायरने अचानक चेंडू बदलला असता तर अशीच परिस्थिती झाली असती. अश्विनने या अंपायरच्या या निर्णयाला विरोध केला होता. त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती.