कच्चे तेल अर्थात क्रूड ऑईल हा जागतिक स्तरावर वापरला जाणारा सर्वात महत्त्वाचा ऊर्जा स्रोत आहे. कच्च्या तेलाच्या महत्त्वामुळे या ऊर्जा स्रोताचा भौतिक व्यापार तसेच डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंगचा समावेश असलेली जागतिक पातळीवर एक विशाल बाजारपेठ अस्तित्वात आहे.
कुठल्याही जागतिक घडामोडीचा कच्च्या तेलाच्या किमतीवर आणि त्याच्या जगातील जवळपास सर्वच देशांच्या अर्थव्यवस्थांवर तत्काळ परिणाम पाहायला मिळतो. त्याचे पडसाद कमोडिटी मार्केटमध्येही उमटतात. कच्च्या तेलाची किंमत ठरवताना, तेलाचे बेंचमार्क किमतीचे साधन म्हणून वापरले जातात. वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट तेल (WTI) आणि ब्रेंट (BRENT) हे सर्वसामान्यपणे वापरले जाणारे बेंचमार्क आहेत.
कमोडिटी ट्रेडिंगमधील सर्वात संवेदनशील कमोडिटी म्हणून क्रूड ऑईलला ओळखले जाते. तेल उत्पादक देशांचे प्रमुख दोन गट आहेत. त्यात पहिला आहे ओपेक / OPEC गट. या गटामध्ये सध्या एकूण 13 सदस्य देश आहेत, तर दुसरा गट आहे OPEC+. या गटात रशियासह 10 देशांचा समावेश आहे. या दोन गटांच्या निर्णयाचा कच्चा तेलाच्या किमतीवर परिणाम होताना दिसतो. अमेरिकादेखील प्रमुख तेल उत्पादक देश असला, तरी तो दोन्हीपैकी कुठल्याही गटाचा सदस्य नाही.
कच्चे तेल इतके महत्त्वाचे का?
जागतिक स्तरावर कच्चे तेल हे सर्वात महत्त्वाच्या इंधन स्रोतांपैकी एक आहे आणि ऐतिहासिकद़ृष्ट्या, जगातील एक तृतीयांश ऊर्जा वापरामध्ये क्रूडचे योगदान आहे. कू्रड ऑईल शोधणे, काढणे, शिपिंग करणे आणि शुद्ध करणे ही एक दीर्घ प्रक्रिया आहे आणि या प्रक्रियेसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध असणे आवश्यक आहे. यामध्ये देशभरातील हजारो मैल तेल पाईपलाईन, प्रमुख तेल व्यापार केंद्रांमधील साठवण सुविधा आणि अनेक रिफायनरीज यांचा समावेश आहे. एकूणच, जागतिक तेल उद्योग हा बहुट्रिलियन डॉलरचा उद्योग आहे.
काही राष्ट्रांची अर्थव्यवस्था क्रूडवर अवलंबून
विमान कंपन्या, प्लास्टिक उत्पादक आणि कृषी व्यवसाय यासारख्या इंधनावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असलेल्या व्यवसायांसाठी तेल विशेष महत्त्वाचे आहे. ऊर्जेचा इतका महत्त्वाचा स्रोत असल्याने क्रूड ही अनेक देशांची प्रमुख आयात आणि निर्यात कमोडिटी आहे. काही अरब राष्ट्रांची अर्थव्यवस्था प्रामुख्याने कच्च्या तेलावरच अवलंबून असल्याचे आपल्याला दिसते. क्रूड ऑईलची कमोडिटी मार्केटमध्ये फ्युचर्स, फॉरवर्डस् आणि ऑप्शन्स ट्रेडिंगमध्ये खूप मोठी उलाढाल होते.
सध्या तेलाचे दर 1 टक्क्यापर्यंत घसरले
चीनकडून मागणी कमी झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाचे दर 1 टक्क्यापर्यंत घसरले. ब्रेंट क्रूड वाढून 80.61 प्रतिबॅरलवर स्थिरावले. जगातील सर्वात मोठा कच्च्या तेलाचा आयातदार असलेल्या चीनकडून मागणी घटल्याने तेलाच्या दरात घसरण झाली आहे. तेलाच्या घसरलेल्या किमतीचा जसा तेल निर्यातदार देशांना तोटा होत असला, तरी भारतासारख्या सुमारे 85 टक्के तेल आयात करणार्या देशांना काही प्रमाणात फायदाही होतो.
OPEC आणि OPEC+ मध्ये कोणकोणत्या देशांचा समावेश?
इराण, इराक, कुवेत, सौदी अरेबिया आणि व्हेनेझुएला या पाच देशांनी सप्टेंबर 1960 मध्ये बगदाद (इराक) येथे पेट्रोलियम पदार्थ निर्यात करणार्या देशांची संघटना (OPEC) स्थापन केली. या संघटनेमध्ये नंतर कतार (1961), लिबिया (1962), संयुक्त अरब अमिराती (1967), अल्जेरिया (1969), नायजेरिया (1971), इक्वाडोर (1973), गॅबॉन (1975), अंगोला, (2007), इक्वेटोरियल गिनी (2017) आणि काँगो (2018) यांचा समावेश झाला. कतार 1 जानेवारी 2019 रोजी संघटनेतून बाहेर पडले, तर OPEC+ मध्ये रशिया, मेक्सिको, कझाकिस्तान, ओमान, अझरबैजान, मलेशिया, बहरीन, दक्षिण सुदान, ब्रुनेई आणि सुदान या देशांचा समावेश होतो.
दोन्ही संघटनाच्या निर्णयाकडे असते जगाचे लक्ष
दोन्ही संघटना किती तेलाचे उत्पादन करायचे, याचा निर्णय घेतात. त्यातून जागतिक पातळीवर तेलाची किमत नियंत्रित करण्याचा प्रयत्न होतो. अनेकदा ओपेक आणि ओपेक+ यांच्यातील विसंवादातून तेलाचे अतिरिक्त उत्पादन घेतले जाते आणि त्यामुळेही तेलाचे दर गडगडतात. त्यामुळे क्रूड ऑईलमध्ये कमोडिटी ट्रेडिंग करताना जागतिक परिस्थिती, तेल उत्पादक राष्ट्रातील अंतर्गत राजकारण, तेलाचे एकूण उत्पादन आणि मागणी आदी विविध गोष्टींचा साकल्याने विचार करावा लागतो.
जगातील बहुसंख्य तेलाचे साठे हे मध्यपूर्वेत आहेत, जे ज्ञात साठ्यांपैकी 48 टक्के आहेत. यानंतर उत्तर अमेरिका, आफ्रिका, मध्य आणि दक्षिण अमेरिका, युरेशिया, आशिया आणि ओशनिया आणि युरोपचा क्रमांक लागतो. ओपेक जगातील कच्च्या तेलाच्या सुमारे 40 टक्के नियंत्रित करते, जो जगातील सिद्ध तेल साठ्यांपैकी सुमारे 75 टक्के हिस्सा आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर एकूण तेल निर्यातीपैकी 55 टक्के निर्यात करते.
कमोडिटी मार्केटवर परिणाम करणारे प्रमुख घटक
1) OPEC आउटपुट किंवा पुरवठा
2)उदयोन्मुख आणि विकसनशील देशांकडून तेलाच्या मागणीत होणारा चढ-उतार 3) यूएस क्रूडचे उत्पादन
4) जागतिक भौगोलिक राजकारण
5) सट्टा खरेदी आणि विक्री
6) हवामान परिस्थिती. (क्रमशः)