महागाई नियंत्रणाची केंद्राची कसरत आणखी कठीण!

महागाई नियंत्रणाची केंद्राची कसरत आणखी कठीण!
Published on
Updated on

कोल्हापूर : देशातील महागाई नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारच्या तारेवरच्या कसरतीला यश येण्याची चिन्हे द़ृष्टिपथात आली असतानाच जागतिक स्तरावर क्रूड ऑईलचा भाव वाढण्याच्या शक्यतेने एक नवे संकट उभे राहिले आहे.

क्रूड ऑईलचे दर सप्टेंबरमध्ये प्रतिबॅरल 90 डॉलर्सच्या पुढे सरकण्याचा अंदाज आहे. या दराने जर 100 डॉलर्सला स्पर्श केला, तर अन्नधान्याची महागाई रोखण्यासाठी उपाय योजूनही अर्थव्यवस्थेवर पुन्हा ताण येऊ शकतो. शिवाय, निवडणुकीच्या तोंडावर वाढणारे पेट्रोल-डिझेलचे भाव सत्ताधार्‍यांच्या तोंडाला फेस आणू शकतात. केंद्र सरकारचे महागाई रोखण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. जुलै महिन्याच्या आकडेवारीनुसार महागाई निर्देशांक 15 महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर म्हणजेच 7.44 टक्क्यांवर होता. 4.87 टक्क्यांवरून महागाईने घेतलेली झेप सत्ताधार्‍यांची झोप उडविणारी होती.

यामध्ये भाजीपाल्याचे दर 37.44 टक्क्यांनी वाढले. मसाल्याचे पदार्थ 21.63 टक्क्यांनी, तर डाळी 13.27 टक्क्याने व तांदूळ 14 टक्क्यांनी वाढला. टोमॅटोच्या भावाने किलोला शंभरी गाठली होती. प्रामुख्याने मान्सूनच्या अनियमिततेमुळे हा तडाखा बसला. यामुळे वाढलेली महागाई रोखण्यासाठी केंद्राने हरतर्‍हेने प्रयत्न केले. टोमॅटोची खरेदी करून बाजारात टोमॅटो उपलब्ध केला. बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर निर्बंध आणले. रशियाकडून गहू आयात करण्याची प्रक्रिया सुरू केली. खाद्यतेलाचे आयात शुल्क कमी केले आणि कांदा वाढणार, या चिंतेने डोळ्यात अश्रू येण्यापूर्वीच कांद्याच्या निर्यातीवर 40 टक्क्यांचे शुल्क आकारण्यास सुरुवात केली.

केंद्राचे हे सर्व निर्णय बाजारातील जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर ठेवण्याचे होते. रिझर्व्ह बँकेनेही पतधोरणात मुरड घालून जैसे थे स्थिती ठेवली. या सर्व प्रयत्नांमुळे, तसेच बाजारात भाजीपाल्याची नवीन आवक सुरू झाल्यामुळे सप्टेंबरच्या प्रारंभालाच महागाई घसरेल, असे चित्र निर्माण झाले होते, पण जागतिक बाजारात क्रूड ऑईलच्या दरवाढीची अवई उठली आहे. परिणामी, भारतीय अर्थव्यवस्थेसमोर एक नवे संकट उभे ठाकले आहे.

रशियाही क्रूड ऑईलचे दर वाढवणार?

सहा महिन्यांपूर्वी देशाचा अर्थसंकल्प मांडतेवळी जागतिक बाजारात क्रूड ऑईलचे दर प्रतिबॅरल 70 ते 73 डॉलर्सच्या आसपास होते. भारताने रशियाकडून मुत्सद्देगिरीच्या जोरावर डिस्काऊंटमध्ये क्रूड ऑईल खरेदी केल्याने अर्थव्यवस्थेला आधार मिळाला, पण आता रशियाही क्रूड ऑईलचे भाव वाढविण्याच्या तयारीत आहे. जगातील तेल उत्पादक राष्ट्रांच्या संघटनेने (ओपेक) क्रूड ऑईलचे उत्पादन नियंत्रित करण्याची भूमिका घेतली आहे. याचा एकत्रित परिणाम जागतिक बाजारात सप्टेंबरच्या पूर्वार्धाला क्रूड ऑईलचे भाव प्रतिबॅरल 90 डॉलर्सचा टप्पा ओलांडतील, असा अंदाज आहे. ही भाववाढ थोडी पुढे सरकली, तर महागाई नियंत्रणाची केंद्र सरकारची कसरत आणखी कठीण होऊ शकते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news