Crude Oil Price : रशियन तेलावरील अमेरिकेच्या बंदीमुळे महागाईचा भडका, दर उच्चांकी पातळीवर
पुढारी ऑनलाईन डेस्क
Crude Oil Price : रशियन तेलाच्या आयातीवर अमेरिकेने बंदी घातली आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीने उच्चांक गाठलाय. कच्चे तेल प्रति बॅरेल १३०.१५ डॉलरवर पोहोचले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी मंगळवारी रशियन तेल आणि इतर ऊर्जा आयातीवर बंदी घातल्याचे जाहीर केले. तर ब्रिटनने, २०२२ च्या अखेरीस रशियन तेल आयात बंद करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
रशिया हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा कच्च्या तेलाचा निर्यातदार देश आहे. रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर तेलाच्या किमती ३० टक्क्यांपेक्षा अधिक वाढल्या आहेत. रशियावरील वाढत्या निर्बंधांमुळे तेल पुरवठ्यात आणखी व्यत्यय येण्याच्या शक्यता आहे. यामुळे खरेदीला चालना मिळाली असल्याचे विश्लेषकांनी म्हणणे आहे.
युरोप आणि ब्रिटनने रशियन तेलाच्या आयातीवर बंदी घातल्यास जागतिक तेलाच्या किमती २०० डॉलर प्रति बॅरलपर्यंत वाढू शकतात, असाही अंदाज अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. रशियातून जागतिक बाजारपेठेत दररोज ७० लाख ते ८० लाख बॅरेल कच्चे तेल आणि इंधन निर्यात होते.
अर्थतज्ज्ञांच्या मतानुसार, रशिया आणि युक्रेन युद्धाचा कालावधी वाढल्यास कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये (Crude Oil Price) आणखी वाढ होवू शकते. याचा थेट परिणाम भारतातील पेट्रोल आणि डिझेल दरवाढीवर होईल. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये प्रति लीटर १० ते १५ रुपये वाढ होण्याची शक्यता आहे. पेट्रोल-डिझेल किंमतीच भडका उडाल्यानंतर भारतातील अत्यावश्यक सेवांसह अन्नधान्य किंमतीमध्येही वाढ होईल. कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये झालेल्या वाढ ही भारतासाठी मोठी डोकदुखी ठरणार आहे.
हे ही वाचा :