Spiritual Tourism : पंढरपूर, अक्कलकोट, तुळजापुरात आध्यात्मिक पर्यटनार्थ मोठी गर्दी

पंढरपूर विठ्ठल-रुक्मिणी
पंढरपूर विठ्ठल-रुक्मिणी

सोलापूर; पुढारी वृत्तसेवा : साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असलेल्या दिवाळी पाडव्यानिमित्त सोमवारपासूनच सोलापूर परिसरातील विविध तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी असलेल्या मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे. दिवाळीनिमित्त लागून आलेल्या सुट्ट्या, शुभमुहूर्ताचा काळ यामुळे आध्यात्मिक पर्यटन करणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे.

विठ्ठल-रुक्मिणीस प्राचीन अलंकार

पंढरपूर : दिवाळीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी भाविक पंढरीत गर्दी करीत आहेत. आज (दि. 14) पाडव्याच्या निमित्ताने येथील श्री विठ्ठल- रुक्मिणीचे नित्योपचार व राजोपचार करण्यात येणार आहेत. तसेच श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेला विविध अलंकार परिधान करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर आकर्षक पाना-फुलांनी मंदिरात आरास साकारण्यात येणार आहे. दिवाळीनिमित्त शासकीय सुट्टी असल्याने भाविक मोठ्या संख्येने सहकुटुंब श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरीत येत आहेत. त्यामुळे भाविकांनी पंढरीनगरी गजबजत आहे. चंद्रभागा वाळवंटात स्नानासाठी भाविक गर्दी करत आहेत. पदस्पर्शासह मुख दर्शनासाठी गर्दी होत आहे. भाविकांची संख्या वाढत
असल्याने बाजारपेठेतही मोठी उलाढाल होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. गेले चार दिवस शासकीय सुट्टी असल्याने लाखोंच्या संख्येने भाविकांनी पंढरीत गर्दी केली होती. तेच चित्र आज दिवाळी पाडवा निमित्त देखील पाहावयाला मिळत आहे.

अक्कलकोटमधील भक्तनिवास हाऊसफुल्ल

अक्कलकोट : दिवाळीनिमित्त येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमास प्रारंभ झाला आहे. आज (मंगळवारी) पाडव्यानिमित्त सायंकाळी पाच ते सात या वेळेत जोतिबा मंडपात अभंग संध्या कार्यक्रम सादर होणार आहे. दरम्यान, सलग सुट्ट्यांमुळे येथील मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. देवस्थान व अन्नछत्र मंडळाचे यात्रीनिवास भक्तांनी फुल्ल झाले आहेत. गर्दीच्या अनुषंगाने श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे हे सुलभ दर्शनासाठी प्रयत्नशील आहेत. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांनी महाप्रसादाकरिता अन्नछत्र मंडळ सज्ज असल्याचे सांगितले.

तुळजापुरात मंदिर मध्यरात्रीपासून खुले

तुळजापूर ः कुलस्वामिनी तथा शक्ती देवता श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी दीपावली पाडव्याच्या निमित्ताने राज्यासह परराज्यातून भाविकांची गर्दी होणार हे लक्षात घेऊन आज (दि. 14) तुळजापूरचे मंदिर मध्यरात्री एक वाजता उघडणार असून लगेच चरणतीर्थ काकडा आरती पार पडणार आहे. मंदिर दर्शनासाठी खुले होणार आहे. भाविकांची गर्दी लक्षात घेता मंदिर संस्थानने मंगळवार, शुक्रवार आणि रविवार या तीन दिवशी मध्यरात्री एक वाजता मंदिर उघडण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळी सहा वाजता मातेच्या नित्य पूजेची घाट देण्यात येणार आहे. यानंतर मातेला पंचामृत अभिषेक तसेच श्रीखंडाचे पाच सिंहासन महापूजा पार पडणार आहेत. सकाळी 11 वाजेपर्यंत अभिषेक पूजा चालणार आहे. त्यानंतर मातेची शोड्षोपचार पूजा पार पडणार आहे. दीपावली पाडव्यानिमित्त मातेला विशेष अलंकार दागदागिन्यांचा साजश्रृंगार करण्यात येणार आहे. मंगळवारी सायंकाळी मातेची मंदिर परिसरात छबिना मिरवणूक काढण्यात येणार आहे. नरक चतुर्दशी व दीपावली दर्श अमावस्या एकत्र आल्याने मातेला दीपावलीतील चार दिवस अभ्यंगस्नान घालण्यात येत आहे. आज सोमवती अमावस्येनिमित्त मातेच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी दिसून येत होती. सध्या शाळांना दिवाळी सुट्टया लागल्याने सहकुटुंब सहपरिवार दर्शनाला येणार्‍यांची संख्या लक्षणीय आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news