मुंबई, पुढारी वृत्तसेवा : शरद पवार काय करणार, असा प्रश्न उपस्थित करत शिवसेना ठाकरे गटाने गुरुवारी आपल्या मुखपत्रातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या रोखाने बाणांचा वर्षाव केला. अजित पवारांच्या गटाला वेगळी भूमिका घेण्यापासून रोखण्यासाठी शरद पवारांनी राजीनाम्याचे पाऊल उचलले का, असा प्रश्न उपस्थित करतानाच या राजीनाम्याने राष्ट्रवादीचे सूत्रधार आपणच असल्याचे शरद पवारांनी दाखवून दिल्याचेही या अग्रलेखात म्हटले आहे.
शरद पवार यांच्या राजीनाम्याची घोषणा आणि त्यावरून निर्माण झालेल्या गदारोळावर ठाकरे गटाचे मुखपत्र असणार्या 'सामना'तून भाष्य केले. यात पवारांच्या राजीनाम्यामागे अजित पवार आणि त्यांच्या गटाची वेगळी भूमिका तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. उद्या राष्ट्रवादीचे काही आमदार वगैरे गेले, तरी जिल्हास्तरावरील फळी आपल्याच मागे राहावी याद़ृष्टीने जनमानस तपासण्याचा हा एक धक्का प्रयोग असू शकतो, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे.
शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा, अशी मागणी नेते करीत असताना अजित पवार यांनी वेगळी भूमिका घेतली. पवारांच्या संमतीने दुसरा अध्यक्ष निवडू, असे अजित पवार म्हणतात; पण राष्ट्रीय अध्यक्षपद सांभाळण्याचा वकुब असलेला नेता निवडताना काळजी घ्यावी लागेल. अजित पवारांच्या राजकारणाचे अंतिम ध्येय हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणे आहे. सुप्रिया सुळे दिल्लीत असतात. त्यांचा तेथील वावर चांगला आहे. संसदेत त्या उत्तम काम करतात, असे सांगत 'सामना'ने एका अर्थाने सुप्रिया सुळे यांचेच नाव अध्यक्षपदासाठी सुचविले आहे.
राष्ट्रवादीतील अनेक नेते सध्या कुंपणावर आहेत. याच कुंपणावरच्या काही नेत्यांनी पवारांच्या राजीनाम्यानंतर सगळ्यात जास्त विलाप केला. शरद पवारांनी या सगळ्यांना उघडे केले. आज जे पायाशी पडले तेच उद्या पाय खेचणार असतील, तर त्यांचे मुखवटे ओरबाडून काढले. पवार हे राजकारणातले भीष्म आहेत; पण भीष्माप्रमाणे आपण शरपंजरी पडलेले नसून, सूत्रधार आपणच आहोत हे त्यांनी दाखवून दिले आहे, असे म्हणत या अग्रलेखातून या राजीनामा नाट्यामागे अजित पवार गट असल्याकडेच निर्देश केला आहे.