होरपळ, तगमग, काहिली; भयंकर भविष्याची चाहूल

होरपळ, तगमग, काहिली; भयंकर भविष्याची चाहूल
Published on
Updated on

मे महिन्यात जळगाव जिल्ह्यामध्ये उष्माघाताने पाचजणांचा बळी घेतल्याने तापमानवाढीच्या संकटाची जाणीव अधिक तीव्र झाली आहे. याहून भयंकर भविष्याची चाहूल यातून लागली आहे.

होळीने थंडीला पळवल्यानंतर उन्हाचे चटके बसायला सुरुवात होते अन् मग सगळीकडे चर्चा सुरू होते ती यंदा कमाल तापमान कितीचा आकडा गाठणार याची. त्यातही राज्यभरातील लोकांचे लक्ष असते ते जळगाव, भुसावळच्या उष्णतेकडे. अलीकडच्या काळात त्यात धुळे, नंदुरबार, मालेगावचीही भर पडली आहे. एवढेच काय, थंड आणि सुखद हवामानाचा अभिमान मिरवणार्‍या नाशिककरांनीही हल्ली 40-41 अंशांशी जुळवून घेतले आहे.

यंदा जळगाव जिल्ह्यात उष्माघाताने पाचजणांचा मृत्यू झाल्याने कमालीच्या उष्णतेचा सराव करून घेतलेल्या जिल्हावासीयांच्याही पोटात गोळा उठला असल्यास नवल नाही. यातील चौघे अगदी तरुण आणि कुटुंबातील कर्ते पुरुष असल्याने या घटनांचे गांभीर्य अधिक वाढले आहे. त्यात रेल्वे कर्मचारी, शेतकरी, महिला अशा घटकांचा समावेश आहे. वाईट गोष्ट म्हणजे, या सार्‍यांना तातडीने उपचार उपलब्ध करून देऊनही डॉक्टर त्यांचा जीव वाचवू शकले नाही. सरकारी यंत्रणेने उभारलेल्या उष्माघात कक्षापर्यंत पोहोचणेही त्यांच्या नशिबी नव्हते. ऊन लागून तडकाफडकी प्राण जाण्याच्या या घटनांमुळे वैद्यकशास्त्रालाही भविष्यात यावर उपचार शोधावे लागतील. या झाल्या सरकारदरबारी नोंद झालेल्या घटना. उष्माघाताचा त्रास होऊन अन्य आजार बळावल्याने झालेल्या मृत्यूंची गणना यात नाही. तो साईड इफेक्ट आणखी घातक असू शकतो.

जळगावात गेल्या वर्षी मे महिन्यात कमाल तापमान 45 अंशांपर्यंत गेले होते. ते यंदा 47 अंशांपर्यंत वाढले आहे. थेट दोन अंशांनी वाढलेले हे तापमान भविष्यातील धोक्याची जाणीव करून देणारे आहे. तापमानात अशीच वाढ सुरू राहिली, तर पुढील काळात कोणते संकट ओढवेल, हे सांगायला कुणा पर्यावरणतज्ज्ञाची गरज नाही.

जळगाव-भुसावळ-चोपडा भागातील तापमान वाढीची कारणे काही जगावेगळी नाहीत. अफाट वृक्षतोड, रस्त्यांच्या रुंदीकरणासाठी दिला जाणारा झाडांचा बळी हीच सार्वत्रिक कारणे इथेही आहेत. कधीकाळी वृक्षराजीने नटलेला, फुललेला सातपुडा पर्वत आता निष्पर्ण होतोय. उन्हाळ्यात वणवे पेटण्याच्या प्रमाणात वाढ होत असल्याने उरलीसुरली झाडेही नष्ट होताहेत. वनसंपदा व वन्यजीव होरपळताहेत. सातपुड्याचे वैशिष्ट्य असलेल्या औषधी वनस्पती नामशेष होत आहेत. अनेक वन्यजीवांचा अधिवासच यामुळे धोक्यात येत आहे.

जिल्ह्यातून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी आतापर्यंत 15 हजार वृक्षांची कत्तल करण्यात आली आहे. महामार्गाच्या कडेला असलेल्या डेरेदार वृक्षांवर वास्तव्य करणारे अनेक दुर्मीळ प्रजातींचे पक्षी यामुळे विस्थापित झाले असून, ते नामशेष होण्याची भीती पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे. वृक्षांचे संवर्धन आणि पुनर्लागवडीकडे मात्र कुणीही लक्ष द्यायला तयार नाही.

भुसावळ तालुक्यात दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्राने रोजगार आणि व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. कालांतराने मात्र येथे प्रदूषणाचा प्रश्न बिकट झाला. या ठिकाणी कोळशापासून वीजनिर्मिती केली जाते. दररोज 16 हजार मेट्रिक टन कोळसा जाळला जातो, तेव्हा त्यातून वीजपुरवठा होऊ शकतो. एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणात कोळसा जाळल्याने तापमानवाढीसह वायू प्रदूषणातही भर पडली आहे. दीपनगर केंद्रातून निघणारी राख आणि धूर आसमंतात पसरल्याने हवा अधिकच उष्ण होऊन भुसावळकरांच्या जिवाची काहिली होत आहे. दीपनगर वीजनिर्मिती केंद्राच्या कुलिंग टॉवर आणि चिमणीतून उष्णतेचे लोटच्या लोट बाहेर फेकले जातात. त्यातच भुसावळ तालुक्यात वृक्षांची संख्या अत्यंत कमी आहे. उर्वरित जिल्ह्यांपेक्षा भुसावळला एक-दोन अंशांनी तापमान जास्त असण्याची ही कारणे आहेत.

जळगाव, भुसावळ तसे तप्त उन्हाळ्यासाठी आधीपासूनच कुप्रसिद्ध; पण डोंगराळ भाग आणि जंगले असलेल्या नंदूरबारनेही 45 अंशांपर्यंत मजल मारणे धोक्याची घंटा वाजवणारे आहे. जिल्ह्याच्या तळोदा, धडगाव, अक्कलकुवा या तालुक्यांसह शहाद्याच्या काही भागात 70 च्या दशकानंतर प्रचंड वृक्षतोड झाली. त्याची फळे आता सर्वजण भोगत आहेत. जागतिक पातळीवर पुढील पाच वर्षे आणखी उष्णतेची राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आल्यानंतरही आपण धडा शिकणार की नाही, हाच प्रश्न आहे.

– प्रताप म. जाधव

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news