पुढारी ऑनलाईन : नुकत्याच करण्यात आलेल्या एका अभ्यासातून कोरोनाच्या मेसेंजर रायबोज न्यूक्लिक अॅसिड (mRNA) लसीबाबत धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. अलीकडे करण्यात आलेल्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, mRNA ही लस हृदय व रक्तवाहिन्यांवर परिणाम करून मृत्यूचा धोका वाढवते. याबाबत बोलताना फ्लोरिडाचे सर्जन जनरल आणि राज्य आरोग्य अधिकारी डॉ. जोसेफ ए. लाडापो म्हणाले की, mRNA लसीमुळे १८ ते ३९ वयोगटातील पुरुषांमध्ये हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी समस्या निर्माण होऊन, त्यांच्या मृत्यूची जोखीम वाढत आहे.
डॉ. जोसेफ यांनी ट्विट केले की, आज आम्ही कोविड-19 mRNA लसीच्या विश्लेषणाविषयी सांगत आहोत. ज्याबद्दल लोकांनी जागरूक असले पाहिजे. mRNA लसीच्या विश्लेषणात लसीकरणानंतर 28 दिवसांच्या आत 18-39 वर्षे वयोगटातील पुरुषांमध्ये हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी समस्या निर्माण होऊन त्यांच्या मृत्यूच्या घटनांमध्ये 84 टक्के वाढ झाल्याचे दिसून आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, पूर्वीपासूनच मायोकार्डिटिस आणि पेरीकार्डिटिस सारख्या हृदयविकारासंबंधित समस्या असलेल्या लोकांना ही लस देताना विशेष खबरदारी घेतली पाहिजे. कोणत्याही औषधाची किंवा लसीची सुरक्षितता आणि परिणामकारकतेचा काळजीपूर्वक अभ्यास करणे हे सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचा घटक आहे. mRNA लसीसंदर्भातील सुरक्षिततेकडे फारसे लक्ष दिले गेले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
भारतात, पुणे स्थित जेनोव्हा बायो फार्मास्युटिकल कंपनीकडून एमआरएनए लस GEMCOVAC-19 च्या आपत्कालीन वापरास मान्यता देण्यात आली आहे. mRNA ही लस 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना दिली जाऊ शकते. विशेष म्हणजे ही लस 2 ते 8 डिग्री सेल्सियस तापमानात स्थिर राहते. एका कुपीमध्ये त्याचे पाच डोस असतात, जे इंट्रामस्क्युलर इंजेक्शनद्वारे शरीरात दिले जातात. पहिल्या डोसनंतर 28 दिवसांच्या अंतराने दुसरा डोस दिला जातो.