पुढारी ऑनलाईन डेस्क : गेल्या २४ तासात ६९२ नवीन कोरोना रूग्णांची नोंद झाली आहे. तर कोरोनामुळे ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, देशभरातील कोरोना सक्रिय रूग्णांची एकूण संख्या ४ हजार ९७ पर्यंत पोहचली आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे. (Covid-19 Updates)
गेल्या २४ तासांत कोरोनामुळे देशात ६ रूग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये दोन महाराष्ट्रतील, दिल्ली, कर्नाटक, केरळ आणि पश्चिम बंगालमधील प्रत्येकी एक रूग्णांचा यामध्ये समावेश आहे. दरम्यान, भारतात जेएन१ (JN.1) या कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटचे बुधवारपर्यंत एकूण १० प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या प्रसिद्धपत्रकात स्पष्ट केले आहे. (Covid-19 Updates)
भारतात कोरोनाच्या जेएन१ या नवीन व्हेरियंटने चिंता वाढवली आहे. दिवसागणिक रुग्णांची संख्या वाढू लागल्याने प्रशासनासह आरोग्य यंत्रणा अॅक्शन मोडवर आली आहे. लक्झेंबर्गमध्ये ऑगस्टमध्ये पहिल्यांदा आढळून आलेला JN.1 सध्या भारतासह सुमारे 41 देशांमध्ये आढळून आला आहे.
नॅशनल इंडियन मेडिकल असोसिएशन कोविड टास्क फोर्सचे सह-अध्यक्ष डॉ राजीव जयदेवन यांनी IANS ला सांगितले की, जेएन 1 व्हेरियंट हा इतर अलीकडील प्रकारांपेक्षा वेगळा आहे. तो त्याच्या पूर्ववर्तीतील काही उत्परिवर्तन होते. त्यामुळे या प्रकारातील रोगप्रतिकारक शक्ती आणि प्रसार क्षमतेच्या नमुन्यांकडे काळजीपूर्वक लक्ष देणे आवश्यक आहे.
कोरोना विषाणू नवा सब व्हेरियंट (COVID-19) JN.1 मुळे पुन्हा एकदा जगभरातील चिंता वाढली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) या सब व्हेरियंटचा समावेश 'व्हेरियंट ऑफ इंटरेस्ट' यादीत केला आहे. यापार्श्वभुमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी कोरोनाबाबत आढावा बैठक घेतली. सर्व राज्यांना केंद्राकडून सर्व सहकार्य केले जाईल. घाबरून जाण्याची गरज नाही तर आपल्याला सतर्क राहण्याची गरज आहे, असे आवाहन मंत्री मांडविया यांनी बैठकीत केले.