पुढारी ऑनलाईन : देशातील काही भागांत पुन्हा एकदा कोरोना डोके वर काढत आहे. यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. देशात गेल्या २४ तासांत ७५२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशातील सक्रिय कोरोना रुग्णसंख्या (active Covid cases) शनिवारी ३ हजारांचा टप्पा ओलांडून ३,४२० वर पोहोचली.
काल शुक्रवारी, देशात ६४० नवे रुगणे आणि एक मृत्यूची नोंद झाली होती. आज सकाळी ८ वाजेपर्यंत अपडेट झालेल्या आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशातील १७ राज्यांत कोविड -१९ च्या सक्रिय रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. यात केरळ (२६६), कर्नाटक (७०), महाराष्ट्र (१५), तामिळनाडू (१३) आणि गुजरात (१२) या राज्यांचा समावेश आहे.
केरळमध्ये दोन मृत्यू आणि कर्नाटक आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मंत्रालयाने दिली आहे. तर आतापर्यंतच्या मृतांचा एकूण आकडा ५,३३,३३२ वर गेला आहे आणि कोरोना मृत्यूचे प्रमाण १.१८ टक्के एवढे आहे.
गेल्या २४ तासांत ३२५ लोक कोरोनातून बरे झाले असून एकूण बरे झालेल्यांची संख्या ४,४४,७१,२१२ झाली आहे, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. राष्ट्रीय पातळीवर रिकव्हरी रेट ९८.८१ टक्के होता.
कोविड -१९ प्रकरणांमध्ये सध्याची वाढ ही चिंतेचे कारण नाही आणि लोकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. दरम्यान, केंद्राने खबरदारीचा उपाय म्हणून फेस मास्क घालण्याचा सल्ला दिला आहे.
देशभरात २१ डिसेंबरपर्यंत कोविडच्या सब-व्हेरियंट JN.1 ची २२ प्रकरणे नोंदवली गेली आहेत, असे सरकारी सूत्रांनी सांगितले. त्यापैकी गोव्यात १९ आणि केरळ आणि महाराष्ट्रात प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. एका प्रकरणाचा तपशील अधिकाऱ्यांनी अद्याप उघड केला नाही.
JN.1 हा ओमायक्रॉनचा एक वंशज असून जागतिक आरोग्य संघटनेने त्याला 'व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट' म्हणून वर्गीकृत केले आहे. हा गेल्या काही आठवड्यांमध्ये सर्वात वेगाने पसरणाऱ्या विषाणूंपैकी एक बनला आहे. अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे की, भारतात JN.1 व्हेरिएंटची सर्व प्रकरणे सौम्य असल्याचे आढळून आले आहे आणि असे रुग्ण बरे झाले आहेत. (Covid cases)
बिहार सरकारने राज्यातील सर्व जिल्हे आणि रुग्णालयांना पाटणा, गया आणि दरभंगा विमानतळांवर आगमनावेळी रँडम म्हणजेच यादृच्छिक पद्धतीने COVID-19 RT-PCR चाचणी वाढवण्याचे निर्देश दिले आहेत.
संबंधित बातम्या