शिक्षणाचा खर्च घटला; तंबाखू, गुटखा, दारूवर वाढला

शिक्षणाचा खर्च घटला; तंबाखू, गुटखा, दारूवर वाढला

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : भारतात लोकांचा खर्च करण्याच्या पद्धतीत बदल झाला असून मागील दहा वर्षांत भारतीयांनी शिक्षणावर खर्च कमी केला असून तंबाखू, दारू व गुटख्यासारख्या नशिल्या पदार्थांवरील खर्च वाढवला आहे. एका सरकारी सर्वेक्षणानुसार ग्रामीण आणि शहरी भागांत हा बदल सारखाच झाला आहे.

राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाने ऑगस्ट 2022 ते जुलै 2023 या काळातील घरगुती खर्चाचे सर्वेक्षण केले होते. त्यानुसार भारतीय दरमहा किती खर्च करतात व कशावर खर्च करतात याची माहिती हाती आली होती. या सर्वेक्षणामुळे देशातील शहरी आणि ग्रामीण भागांतील तसेच विविध राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील सामाजिक व आर्थिक घटक यांचा खर्च कसा होत आहे हे समोर आले आहे.

मागील दहा वर्षांत सर्वसामान्य भारतीयांचा पान, तंबाखू आणि इतर नशिल्या पदार्थांवरील खर्च वाढला आहे तर शिक्षणावरील खर्च कमी झाला आहे. शहरी भागांत शिक्षणावरील खर्च 2011-12 मध्ये 6.90 टक्के होता. तो 2022-23 मध्ये 5.78 टक्के इतका खाली आला. ग्रामीण भागांतही हा खर्च 2011-12 मध्ये 3.49 टक्के होता. तो 2022-23 मध्ये तो 3.30 टक्क्यांवर आला.

प्रक्रिया केलेल्या अन्नावर खर्च

या सर्वेक्षणातून आणखी एक बाब समोर आली आहे की, शहरी भागात शीतपेये, पदार्थ व प्रक्रिया केलेल्या पदार्थांवरील खर्चात वाढ झाली आहे. ही वाढ इतर बाबींपेक्षा अधिक आहे. शहरी भागांत 2011-12 मध्ये यावरील खर्च 8.98 टक्के होता. तो 2022-23 मध्ये 10.64 टक्के झाला. ग्रामीण भागातही या खर्चात वाढ झाल्याचे दिसते. ग्रामीण भागात 2011-12 मध्ये या बाबीवर 7.90 टक्के होता, तो 2022-23 मध्ये 9.62 टक्क्यांवर पोहोचला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news