रेशन धान्य दुकानांना येणार ‘कॉर्पोरेट लूक’

रेशन धान्य दुकानांना येणार ‘कॉर्पोरेट लूक’

Published on

कोल्हापूर ; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील रेशन धान्य दुकानांना आता कॉर्पोरेट लूक येणार आहे. धान्य दुकानांचे आयएसओ मानांकन करण्यात येणार आहे. त्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. आयएसओ मानांकनासाठी दुकानदारांनीही कंबर कसली आहे.

रेशन धान्य दुकानांचे आयएसओ मानांकन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्वच 1680 दुकानांचा लूक बदलला जाणार आहे. पारंपरिक रेशन धान्य दुकानाचे चित्र यानिमित्ताने पूर्ण बदलले जाणार आहे. दुकानांची स्वच्छता आणि पारदर्शी कामकाजाला प्राधान्य दिले जाणार आहे. रेशन दुकानांसह जिल्हा पुरवठा कार्यालय, शहर अन्नधान्य वितरण अधिकारी यांची कार्यालये, सर्व गोदाम यांचेही आयएसओ मानांकन करून घेतले जाणार आहे.

काय होणार आहे

रेशन दुकानांचे सध्या दिसणारे चित्र अधिक उत्साही आणि आकर्षक असेल. आकर्षक रंगसंगतीने दुकाने रंगवली जातील. दुकानदाराच्या अंगावर निळ्या रंगाचा 'अ‍ॅप्रन' असेल. दुकानात तो वापरणे बंधनकारक राहणार आहे. प्रत्येक दुकानदाराला पुरवठा विभागाकडून ओळखपत्र दिले जाईल, त्यावर कोडही असेल. हे ओळखपत्र दुकानात वापरणे बंधनकारक राहील. प्रत्येक दुकानात आग प्रतिबंधक युनिट असेल, तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जातील.

पारदर्शी कामकाज होईल

वजन-काटे प्रमाणित असल्याचे प्रमाणपत्र दुकानाबाहेर लावले जाईल, त्याबाबत शंका असल्यास कोठे तक्रार करायची, याबाबतचे क्रमांक, पत्त्याचाही बोर्ड दुकानाबाहेर लावला जाईल. दुकानदार, तसेच दुकानाबाबत काही तक्रारी असल्यास त्याबाबतही कोठे तक्रार करावी, याची माहिती देणारे बोर्ड लावणे बंधनकारक राहणार आहे. दुकानातील उपलब्ध धान्याची आवक-जावक, उपलब्ध साठा याचीही माहिती या बोर्डवर लिहिण्यात येणार आहे.

आयएसओ मानांकनामुळे रेशन धान्य दुकानांच्या कामकाजाला शिस्त येईल. त्यातून पारदर्शी कारभार होईल. अधिकारी, कर्मचार्‍यांसह रेशन धान्य दुकानदारांचे याबाबत प्रशिक्षणही आयोजित केले जाणार आहे. या प्रणालीचा नागरिकांना मोठा फायदा होईल.
– दत्तात्रय कवितके, जिल्हा पुरवठा अधिकारी

या निमित्ताने ग्राहकांना अधिक उत्तम सेवा देण्याची संधी निर्माण झाली आहे. यानिमित्ताने रेशन धान्य दुकानदारांचाही दर्जा वाढणार आहे. पुणे विभागात प्रथमच आयएसओ मानांकन होत आहे. यामध्ये दुकानदार स्वखुशीने सहभागी झाले आहेत. त्यातून वेगळा ठसा उमटला जाईल.
– रवींद्र मोेरे, जिल्हाध्यक्ष, रास्तभाव धान्य दुकानदार संघटना

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news