पुढारी ऑनलाईन: गेल्या दोन वर्षांपासून थैमान घातलेल्या कोरोनाने पुन्हा एकदा मान वर काढली आहे. चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे भारतीयांच्या मनात लॉकडाऊनची भीती निर्माण झाली आहे. अनेक राज्यांनी आपल्या नागरिकांना मास्क घालण्याचा तसेच सामाजिक मेळावे टाळण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान, IIT कानपूरने एका अभ्यासात सुमारे ९८ टक्के भारतीयांमध्ये कोरोनाशी लढण्याची नैसर्गिक प्रतिकार क्षमता असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत घाबरून न जाता, सुरक्षिततेविषयी योग्य काळजी घेणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.
आयआयटी कानपूरचे प्रोफेसर मनिंद्र अग्रवाल यांनी ट्विट करून या संशोधनाची माहिती दिली आहे. त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, भारतीयांमध्ये ९८ टक्के प्रतिकारशक्ती आहे, त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही. कोरोना प्रादुर्भावाच्या या लाटेत भारतीयांची प्रतिकारशक्ती कमी होऊ शकते. त्यामुळे कोरोनाचा काहीशा प्रमाणात संसर्ग वाढू शकतो. परंतु, कोरोनाची लक्षणीय वाढ होण्याची शक्यता फारच कमी आहे.
आयआयटी कानपूरने कोरोनावर आधारित त्यांच्या गणितीय मॉडेलवरून केलेल्या संशोधनाविषयी प्रोफेसर अग्रवाल म्हणाले की, भारताच्या तुलनेत चीनमधील लोकांमध्ये ऑक्टोबरपर्यंत केवळ पाच टक्के नैसर्गिक प्रतिकारशक्ती होती. नोव्हेंबरमध्ये चीनमधील लोकांमध्ये २० टक्के नैसर्गिक प्रतिकारशक्ती होती. नोव्हेंबरपासूनच येथे कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढू लागली. चीनी सरकारकडून ५ पैकी १ प्रकरण नोंदवण्यात आली आहेत.
भारतीयांच्या तुलनेत, इतर देशांची प्रति व्यक्ति नैसर्गिक प्रतिकारशक्ती कमी असल्याने, कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होऊ शकतो, असे या संशोधनातून सांगण्यात आले आहे. या अभ्यासात नोंदवण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, जपान-४०%, कोरिया-२५ %, अमेरिका-२० %, या देशांची नैसर्गिक प्रतिकारशक्ती आहे. त्यामुळे ब्राझीलप्रमाणेच या देशांमध्ये कोरोनाची लाट कायम राहण्याची अंदाज या संशोधनातून व्यक्त करण्यात आला आहे.