नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन : Corona Varient Omicron : कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉन जगभरासह भारतात पसरत आहे. याबाबत केंद्र आणि राज्याकडून मार्गदर्शक सुचना केल्या जात आहेत. दरम्यान आंतराष्ट्रीय विमान उड्डानाची पुन्हा तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. ३१ जानेवारी २०२२ पर्यंत विमान उड्डाणे थांबवण्यात आली आहेत.
नागरी विमान वाहतूक महासंचालकांनी (DGCA) जारी केलेल्या पत्रात ही माहिती देण्यात आली आहे. कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षी २३ मार्चपासून देशात अनुसूचित आंतरराष्ट्रीय उड्डाणे निलंबित करण्यात आली आहेत. देशात सध्या २४ हून अधिक देशांमध्ये एअर बबल प्रणाली अंतर्गत विशेष उड्डाणे चालविली जात आहेत.
देशातील कोरोनाचे रुग्ण कमी झाल्यामुळे सरकारने १५ डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु कोरोनाचे नवीन प्रकार ओमायक्रॉनच्या धोक्यामुळे पुन्हा विमान उड्डाण थांबवण्यात आली आहेत. अनेक देशांमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून आल्याने विरोधकांनी पंतप्रधान मोदींकडे जोखीम असलेल्या देशांतून येणाऱ्या विमान प्रवासांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
राज्यसभेत या संदर्भातील लेखी उत्तरात केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी म्हटले आहे की, जगभरात गतीने चाललेल्या कोरोना प्रतिबंधक लसीमुळे तसेच कोरोनाचा प्रभाव ओसरत चालल्याने आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक पूर्ववत करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, ओमायक्रॉनमुळे जगाची चिंता पुन्हा वाढल्याने हवाई वाहतूक सुरू करण्यासंदर्भात आढावा घेतला गेला आणि निर्बंधांचा कालावधी वाढवण्यात आला.
देशात बुधवारी दिवसभरात ९ हजार ४१९ कोरोनाबाधित आढळून आले, तर १५९ रुग्णांचा मृत्यू झाला. ८ हजार २५१ रुग्णांनी कोरोनावर मात केली. गुरुवारी देशाचा कोरोनामुक्ती दर ९८.३६ टक्के होता. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३ कोटी ४६ लाख ६६ हजार २४१ वर पोहोचली आहे. यातील ३ कोटी ४० लाख ९७ हजार ३८८ रुग्णांनी कोरोनावर मात केली. तर ९४ हजार ७४२ सक्रिय रुग्ण (०.२७ टक्के) आहेत. आतापर्यंत ४ लाख ७४ हजार १११ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे.