अजित पवारांच्या नावाची कोनशिला हटवली; घड्याळ चिन्हही काढले

अजित पवारांच्या नावाची कोनशिला हटवली; घड्याळ चिन्हही काढले
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व घड्याळ हे निवडणूक चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिल्याच्या विरोधात शरद पवार गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी डेंगळे पुलाजवळील पक्ष कार्यालयात बुधवारी निषेध बैठक घेतली. यावेळी काही कार्यकर्त्यांनी अजित पवार यांचे नाव असलेली कार्यालयाच्या उद्घाटनाची कोनशिलेची फरशी काढून टाकली. तसेच या फरशीवरील अजित पवार यांचे नाव हातोड्याने तोडून टाकले. ही बाब अजित पवार गटाच्या काही पदाधिकार्‍यांना समजताच त्यांनी तेथे धाव घेतल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या गटाला पक्षाचे नवीन नाव सुचवण्याची मुदत बुधवारी सायंकाळी चारपर्यंत दिली होती. त्यानुसार शरद पवार गटाने 'राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार' असे नाव सुचवले व ते निवडणूक आयोगाने मान्यही केले. तत्पूर्वी निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांची बुधवारी सकाळी डेंगळे पूल येथील शहर कार्यालयात बैठक बोलावली होती. तसेच पक्ष कार्यालयावरील घड्याळ हे चिन्ह काढून जुन्या नावावर काळे कापड झाकले.

गेली 24 वर्षे अजित पवारांसमेवत काम केले असून, असा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. ते आमचे शत्रू नाहीत; त्यांचाही आदर ठेवला पाहिजे. या घटनेचे समर्थन करत नाही, पुढील काळात त्यांच्या विरोधातील घोषणाबाजी, नावाचा चुकीचा वापर खपवून घेणार नाही.

– प्रशांत जगताप, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार

अजित पवार यांनी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना महापौर केले, 'राष्ट्रवादी'चे शहराध्यक्ष बनवले. त्यांच्या उपस्थितीदरम्यान अजित पवारांचे नाव दगडाने आणि हातोडीने तोडण्यात येते, हे काही बरोबर नाही. असे कृत्य केल्याने ते नाव जात नाही. यापुढील काळात असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. 'राष्ट्रवादी'च्या कार्यालयाची मुदत संपली आहे. या कार्यालयाचा करार प्रशांत जगताप यांच्या नावाने केला आहे. हे कार्यालयही त्यांच्या हातून जाणार नाही, याची त्यांनी काळजी घ्यावी.

– दीपक मानकर, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news