पुणे : गार हवा, पाऊस, किंचित थंडी अन् ढगाळ वातावरण

पुणे; पुढारी वृत्तसेवा : अफगाणिस्तानवर हवेचे चक्रीवादळ निर्माण झाल्याने हे वारे अरबी समुद्राकडून हिमालयात उच्च आर्द्रता घेऊन जात आहेत, त्यामुळे 23 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या काळात हिमालयात पावसासह बर्फवृष्टी होईल तसेच देशातील बहुतांश भागांत गार हवा, पाऊस, किंचित थंडी अन् ढगाळ वातावरण असे विचित्र हवामान राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

महाराष्ट्रातील बहुतांश भागांत हलका ते मध्य पावसाचा अंदाजही आहे. हिमालयासह जम्मू-काश्मीर,लद्दाख, दिल्ली, पंजाब, हरियानापासून मध्यप्रदेशपर्यंत पश्चिमी चक्रावात सक्रिय झाला आहे. मात्र, पाऊस अन् ढगाळ वातावरणामुळे थंडी कमी राहील. मात्र, दिवसाचे कमाल तापमान कमी होईल.

याचा परिणाम महाराष्ट्रात होणार असून, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाची शक्यता 23 जानेवारी ते 2 फेब्रुवारीपर्यंत आहे. हवेची द्रोणीयस्थिती झाल्याने उत्तर भारताकडून येणारे गार वारे व बंगालच्या उपसागरातून येणारे दमट वारे यांची टक्कर महाराष्ट्रावर होणार आहे. त्यामुळे असे विचित्र वातावरण राज्यात पाहावयास मिळत आहे. राज्यात मोठ्या प्रमाणावर ढगांची दाट गर्दी होऊन बहुतांश भागांत पावसाची शक्यता आहे.

उत्तर भारताकडून येणारे गार वारे व बंगालच्या उपसागराकडून येणारे दमट वारे यांची टक्कर महाराष्ट्रावर होत असल्याने ढगांची गर्दी वाढून किमान तापमानात किंचित वाढ होईल. मात्र, दिवसाचे प्रखर ऊन कमी होऊन कमाल तापमानात घट होऊन गारवा जाणवेल.
                                                                             -अनुपम कश्यपि,
                                                                     हवामान विभागप्रमुख, पुणे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news