सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात संततधार

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात संततधार

सातारा, पुढारी वृत्तसेवा : सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे पावसाची संततधार सुरूच आहे. अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. यामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले असून खरीप पेरण्या युध्दपातळीवर सुरू आहे. पावसामुळे पश्चिम भागातील धबधबे फेसाळू लागले असून पावसाळी पर्यटनाला बहर आला आहे.

जिल्ह्याच्या सातारा, कराड, पाटण, जावली, महाबळेश्वर व वाई तालुक्याच्या पश्चिम भागात पावसाची संततधार कायम असल्याने शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. भाताच्या तरव्यांना हा पाऊस समाधानकारक आहे. दिवसभर ढगाळ वातावरण असल्याने हवेत गारठा निर्माण झाला आहे. पश्चिम भागात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडत असल्याने दरडी कोसळण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. डोंगररांगात छोटे मोठे धबधबे वाहू लागले आहेत. पावसाळी पर्यटनासाठी कास, ठोसेघर, चाळकेवाडी, बामणोली, तापोळा, पाचगणी, महाबळेश्वर या ठिकाणी पर्यटकांची गर्दी होत आहे.

जिल्ह्यातील शेत शिवारात खरीप हंगामातील मशागतीची कामे युध्दपातळीवर सुरू आहेत तर काही ठिकाणी पेरणीची कामे सुरू आहेत. त्यामुळे शेतशिवारे बळीराजाच्या गर्दीने गजबजून गेली आहेत. ठिकठिकाणी शेतकर्‍यांची पेरणीसाठी धांदल उडाली आहे. शहर व परिसरात विविध कृषि दुकानामध्ये बियाणे व खते खरेदीसाठी शेतकर्‍यांची गर्दी होवू लागली आहे. पावसापासून बचाव करण्यासाठी शहर व परिसरातील बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाळी साहित्य विक्रीसाठी आले असून रेनकोटस, टोप्या, छत्री, जर्कीन्स, बुट, चपल्या यासह अन्य साहित्यास नागरिकांमधून चांगली मागणी आहे.

महाबळेश्वरला जोर कायम

गुरूवारी सायंकाळी 6.30 पर्यंत सातारा जिल्ह्यात सातारा तालुक्यात 10.2 मिमी, जावली 21.3 मिमी, पाटण 12.3 मिमी, कराड 2.5 मिमी, कोरेगाव 3.1 मिमी, खटाव 0.6 मिमी, माण 0.1 मिमी, फलटण 0.4 मिमी, खंडाळा 3.1 मिमी, वाई 8.9 मिमी आणि महाबळेश्वर तालुक्यात 59.5 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news