पुढारी ऑनलाईन डेस्क : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने घवघवीत यश मिळवले आहे. पक्षाने स्पष्ट बहुमत मिळवल्याचे आजच्या ( दि. १३ ) निकालानंतर स्पष्ट झाले. आता भाजपच्या पराभवाची आणि काँग्रेसच्या विजयाचे विश्लेषण राजकीय वर्तुळात सुरु झाले आहे. काँग्रेसला कर्नाटकात मिळालेल्या यशाबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी आपले मत मांडले आहे. ( Karnataka Election Results 2023 )
माध्यमांशी बोलताना जयराम रमेश म्हणाले की, "आम्ही कर्नाटक विधानसभा निवडणूक कर्नाटकमधील प्रश्नांवरच लढलो. आम्ही ही निवडणूक राष्ट्रीय निवडणूक केली नाही तर विधानसभा निवडणुकीसारखीच लढवली. हा काँग्रेसचा विजय तर पंतप्रधान मोदींचा निर्णायक पराभव आहे. कारण पंतप्रधान मोदींशिवाय भाजपला दुसरा चेहराच नव्हता."
आम्ही उपस्थित केलेले मुद्दे राज्याशी संबंधित होते; पण भाजपने कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार हा पंतप्रधान मोदींसाठी सार्वमतसारखा बनवला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले होते की, तुम्ही काँग्रेसला मत दिल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आशीर्वाद तुमच्यासोबत नसतील. पंतप्रधान मोदींचा प्रचार कर्नाटकच्या जनतेने पूर्णपणे नाकारला, असेही जयराम रमेश यांनी या वेळी सांगितले. ( Karnataka Election Results 2023 )
दरम्यान, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी 'ऑपरेशन लोटस'वरुन केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना जोरदार टोला लगावला. कर्नाटकमध्ये भाजप ऑपरेशन लोटस राबविण्याचा प्रयत्न करेल मात्र राज्यात काँग्रेसचे नेते मजबूत आहेत. कर्नाटक राज्यात काँग्रेसच सत्तेत येईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची वाटचाल बहुमताकडे सुरु आहे. अशातच भाजप कर्नाटकमध्ये 'ऑपरेशन लोटस' राबवेल, अशी भीती काँग्रेसचे काही नेते व्यक्त करत आहेत. यावर प्रतिक्रिया देताना दिग्विजय सिंह म्हणाले की, भाजपने कर्नाटकमध्ये 'ऑपरेशन लोटस' होऊ शकत नाही कारण या राज्यातील काँग्रेसमध्ये ज्योतिरादित्य शिंदे नाहीत. कर्नाटकात काँग्रेसचे नेते मजबूत आहेत, असेही ते म्हणाले.
हेही वाचा :