पुढारी ऑनलाईन डेस्क : मणिपूर हिंसाचारावरून विरोधकांनी मोदी सरकारविरूद्ध आणलेल्या अविश्वास प्रस्तावावरील चर्चेत बोलताना काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Congress MP Rahul Gandhi) यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. "पंतप्रधान आजपर्यंत मणिपूरला गेलेच नाहीत. त्यांच्यासाठी मणिपूर म्हणजे भारत नव्हे. वास्तव हे आहे की मणिपूर उरलेच नाही. मणिपूरचे दोन तुकडे केले आहेत. मणिपूरमध्ये अतिशय भयानक अवस्था आहे. मणिपूरमध्ये हिंदुस्तानची, भारत मातेची हत्या झाली आहे, अशा शब्दांत राहुल गांधींनी मोदी सरकारवर जोरदार प्रहार केला. राहुल गांधी बोलत असताना सभागृहात जोरदार गदारोळ झाला. (No-confidence motion in Lok Sabha)
अविश्वास प्रस्तावावरील चर्चा मंगळवारपासून लोकसभेत सुरू झाली अन् सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक लढाईला तोंड फुटले. काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांनी लोकसभेत मोदी सरकारच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव मांडला होता. त्यावर कालपासून लोकसभेत चर्चेला सुरूवात झाली. आज राहुल गांधी या प्रस्तावावर बोलताना सत्ताधारी भाजपवर हल्ला चढवला.
काही दिवसांपूर्वी मणिपूरला गेलो होतो. पण आमचे पंतप्रधान गेले नाहीत. कारण मणिपूर त्यांच्यासाठी भारत नाही. सरकारने मणिपूरचे दोन भाग केले आहेत. भारत हा आपल्या लोकांचा आवाज आहे. तो हृदयाचा आवाज आहे. तो आवाज मणिपूरमध्ये मारला गेला. तुम्ही मणिपूरमध्ये भारत मातेची हत्या केली. तुम्ही भारतमातेचे रक्षक नाही, भारतमातेचे मारेकरी आहात. तुम्ही देशद्रोही आहात, त्यामुळेच पंतप्रधान मणिपूरला जाऊ शकत नाहीत, असा घणाघात राहुल गांधी यांनी केला. त्याच्या या वक्तव्यावर सत्ताधारी पक्षाने गदारोळ केला. मणिपूरमध्ये जे काही घडले त्याला काँग्रेस जबाबदार आहे. राहुल यांनी माफी मागावी, अशी मागणी केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी केली. राहुल गांधींच्या वक्तव्याला स्मृती इराणी यांनी प्रत्युत्तर दिले. भारतमातेच्या हत्येची चर्चा करणारे कधीच टेबलावर हात मारत नाहीत. आईच्या हत्येसाठी काँग्रेसवाल्यांनी बसून टेबल थोपटले, असं त्या म्हणाल्या. स्मृती इराणी बोलत असतानाच राहुल गांधी सभागृहातून बाहेर पडले, ते राजस्थानला जाणार आहेत.
"मणिपूरमध्ये तुम्ही माझ्या आईची हत्या केली आहे. जोपर्यंत तुम्ही हिंसाचार थांबवत नाही तोपर्यंत तुम्ही माझ्या आईला मारत आहात. भारतीय सैन्य मणिपूरमध्ये एका दिवसात शांतता प्रस्थापित करू शकते पण तुम्ही त्याचा वापर करत नाही. कारण तुम्हाला भारत मातेला मणिपूरमध्ये मारायचे आहे. जर तुम्ही भारत मातेचा आवाज ऐकत नसाल तर तुम्ही कोणाचा आवाज ऐकता. तुम्हाला फक्त दोन लोकांचे आवाज ऐकू येतात. रावण दोन लोकांचे ऐकत असे. मेघनाद आणि कुंभकर्ण; तसे नरेंद्र मोदी दोन लोकांचे ऐकतात, अमित शहा आणि अदानी यांचे. हनुमानाने लंका जाळली नाही तर ती रावणाच्या अहंकाराने जळली. रावणाचा वध रामाने केला नाही, तर त्याच्या अहंकाराने केला," अशी टीका राहुल गांधींनी केली.
अदानींवर बोलल्याने ज्येष्ठ नेते दुखावले
राहुल गांधी यांनी भाषण सुरू करताच लोकसभेत गदारोळ सुरू झाला. यावेळी राहुल गांधी म्हणाले, आज मी फार टीका करणार नाही. अदानीच्या मुद्द्यावर बोलणार नाही. याआधी बोललो होतो तेव्हा ज्येष्ठ नेते त्रस्त झाले. पण आता घाबरण्याची गरज नाही. आज माझे भाषण अदानींवर होणार नाही. तुम्ही आराम करू शकता. रुमी म्हणाले होते, जे शब्द हृदयातून येतात, ते शब्द हृदयात जातात. त्यामुळे आज मला माझ्या डोक्यातून नाही तर मनापासून बोलायचे आहे. (No-confidence motion in Lok Sabha)
जेव्हा मी भारत जोडो यात्रा सुरू केली तेव्हा ती कशासाठी आहे हे देखील मला माहित नव्हते. दररोज मी 8 ते 10 किमी धावत असे, त्यामुळे 25 किमी धावणे माझ्यासाठी अवघड नाही असे वाटले. माझ्यात अहंकार होता, पण भारत अहंकार लगेच नष्ट करतो. पहिल्या दोन-तीन दिवसांत गुडघेदुखीमुळे माझा अहंकार नष्ट झाला. जो उद्धटपणाने भारत बघायला बाहेर पडला होता, त्याला उद्या चालता येईल की नाही असे रोज वाटू लागले. पहिल्या दोन-तीन दिवसांतच अहंकार होता तो नाहीसा झाला. समुद्रापासून काश्मीर खोऱ्यापर्यंत चाललो. कुठली न कुठली शक्ती मला मदत करायची. लोकांमुळे यात्रेला बळ मिळाले. देश समजून घेण्यासाठी सुरू केलेली भारत जोडो यात्रा अजून संपलेली नाही, असे राहुल गांधी यांनी सांगितले.