राजस्थानात काँग्रेसला अपेक्षा

राजस्थानात काँग्रेसला अपेक्षा
Published on
Updated on

राजस्थानमध्ये गेल्या निवडणुकीत भाजपच्या झंझावातापुढे काँग्रेसचा सुपडासाफ झाला होता. यावेळी काँग्रेसला खाते खोलण्याची आशा आहे.

25 जागांवर एकूण 266 उमेदवार आपले भाग्य आजमावून पाहत आहेत. यातील 14 जागांवर 26 महिला उमेदवार रिंगणात आहेत. भरतपूर मतदार संघात सर्वाधिक म्हणजे तीन महिला निवडणूक लढवत आहेत. सुमारे 52 टक्के मतदार युवक असून 85 वर्षांहून अधिक वय असलेल्या मतदारांची संख्या 5.74 लाख आहे. 19 एप्रिलला मतदानाच्या पहिल्या टप्प्यात 12 जागांसाठी 114 उमेदवार रिंगणात आहेत. त्यात 102 पुरुष आणि 12 महिला मैदानात आहेत. यावेळी चितोडगड मतदार संघात सर्वाधिक म्हणजे 18 उमेदवार, तर धोलपूर मतदार संघात सर्वात कमी म्हणजे 4 उमेदवार आहेत.

पहिल्या टप्प्यात एकूण 2 कोटी 54 लाख 29 हजार 610 मतदार मतदानाचा हक्क बजावण्यास सज्ज आहेत. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांनी तळागाळातील कार्यकर्ते अहोरात्र मेहनत घेत आहेत. भाजपचे स्टार प्रचारक असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, राजनाथ सिंह, योगी आदित्यनाथ यांच्या सभा पार पडल्या आहेत. काँग्रेसकडून सोनिया गांधी, प्रियांका गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह अन्य प्रमुख नेत्यांच्या प्रचारसभा पार पडल्या आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची पाटी कोरी राहिली होती. यावेळी काँग्रेसने राजस्थानात खाते खोलण्यासाठी जोमदार प्रयत्न सुरू केले आहेत. काँग्रेसने जारी केलेला जाहीरनामा घरोघरी वाटण्यात येत आहे.

भाजपने विकासाबरोबरच गेल्या दहा वर्षांत मोदी सरकारने राबविलेल्या योजनांना मिळालेले यश मतदारांसमोर मांडण्यावर भर दिला आहे. प्रचाराचा मुद्दा विचारात घेतला, तर भाजपने आघाडी घेतली आहे. भाजपने यावेळी चारशेहून अधिक जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे. प्रत्येक जागेवर भाजपने प्रचाराचा धडाका लावला आहे. केंद्रात आणि राज्यातही सत्ता असल्यामुळे या पक्षाकडे कसलीच कमतरता नाही. पंतप्रधान मोदी यांचे कुशल नेतृत्व, विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे निर्माण झालेला उत्साह, समर्पित कार्यकर्ते आणि मजबूत पक्ष संघटनेमुळे भाजपची बाजू भक्कम बनली आहे. राजस्थानात यावेळी जयपूर, जोधपूर आणि बिकानेर या तीन प्रमुख लोकसभा मतदार संघांत भाजप आणि काँग्रेस यांच्यात 'काँटे की टक्कर' दिसून येत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news