मणिपूर लष्कराकडे सोपवा काँग्रेसची मागणी; महिला आमदार आक्रमक

मणिपूर लष्कराकडे सोपवा काँग्रेसची मागणी; महिला आमदार आक्रमक

मुंबई : केंद्र आणि राज्यातील भाजप सरकार महिलांबाबत असंवेदनशील आहे, अशा शब्दांत काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर त्यांनी मणिपूर प्रश्नावर शुक्रवारी संताप व्यक्त केला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मणिपूर लष्कराकडे सोपवा, अशी मागणी शुक्रवारी केली.

विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना ठाकूर यांनी भाजपचा समाचार घेतला. मणिपूरमध्ये जे घडले ते अतिशय वेदनादायी आहे. तेथील महिलांवरील अत्याचाराचा व्हिडीओ पाहिल्यानंतर धक्काच बसला. सरकार या प्रश्नावर काहीच पावले उचलत नाही. पंतप्रधान दोन महिने काहीच बोलत नाहीत. ती क्लिप व्हायरल झाल्यानंतर ते दोन शब्द बोलले. या प्रकरणावर पंतप्रधानांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

देशात महाभारत घडणार!

ज्या-ज्या वेळेला देशात महिलांवर अत्याचार झाले, त्या-त्यावेळेला महाभारतच घडले आहे. आता जे सत्तेत बसले आहेत ते बेजबाबदारीने वागत आहेत. त्यांनी त्यांच्या खुर्च्या खाली केल्या पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली.

मणिपूरची घटना माणुसकीला काळिमा फासणारी : वर्षा गायकवाड

मणिपूरची घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. या घटनेसंदर्भात एक ठराव झाला पाहिजे होता. जेणेकरून तेथील महिलांना संरक्षण मिळायला पाहिजे, मणिपूर सरकारचा धिक्कार झाला पाहिजे, ही भावना आम्ही व्यक्त केली होती. या घटनेवर आम्ही सभागृहात बोलण्याचा प्रयत्न केला. आम्हाला बोलण्याची संधी द्या, अशी मागणी अध्यक्षांना केली; पण दुर्दैवाने त्यांनी आम्हाला पाच मिनिटेही बोलू दिले नाही, असे पक्षाच्या नेत्या आमदार वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

मणिपूर लष्कराकडे सोपवा : पृथ्वीराज चव्हाण

देशात दुर्भाग्यपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. या विषयावर विरोधकांचा आवाज दाबून टाकला जात आहे, असा आरोप काँगे्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 2017 मधील एका ट्विटचा दाखला त्यांनी दिला. त्यावेळेला काँग्रेसचे सरकार होते. मणिपूरच्या परिस्थितीवर बोलताना मोदींनी ज्या सरकारला कायदा-सुव्यवस्था सांभाळता येत नाही, त्याला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, असे म्हटले होते. त्यामुळे मोदींनी 2014 आणि 2017 पूर्वी आपले जे विचार होते, त्याची अंमलबजावणी करावी, असा टोला त्यांनी लगावला. मणिपूर लष्कराच्या ताब्यात देण्याची मागणीही त्यांनी केली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news