चिंता घटत्या पक्षी संख्येची

चिंता घटत्या पक्षी संख्येची

Published on

एका ताज्या अहवालानुसार, भारतात पक्ष्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. अनेक वर्षांपासून असणारी झाडे विकासाच्या नावावर तोडली जात आहेत. दुसरीकडे, कीटकनाशकांचा बेसुमार वापर होत असल्याने पक्ष्यांचे आवडते खाद्यकिडे कमी होत आहेत. हवामान बदलाचा दुष्परिणाम म्हणजे पक्ष्यांत जीवघेणे आजार पसरत आहेत. संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढत आहे. हवाई सेवेच्या विस्तारांमुळे वाढलेली उड्डाणे, मोबाईल टॉवरच्या लहरी यामुळे पक्ष्यांचा विहार कमी होत आहे आणि त्यांची संख्यादेखील कमी होत आहे. पक्ष्यांची संख्या कमी होणे, हा एक प्रकारे देशाच्या समृद्ध जैवविविधतेवर हल्ला आहे.

'भारतातील पक्ष्यांची स्थिती-2023' नामक अहवाल हा केवळ पक्ष्यांसाठीच नाही, तर पृथ्वीवरच्या मानवासाठीही धोक्याची घंटा ठरणारी बाब आहे. गेल्या 25 वर्षांत पक्ष्यांच्या विविध प्रजातींवर हल्ले झाले आहेत. अनेक प्रजाती लुप्त झाल्या, तर काहींची संख्या बोटांवर मोजण्याइतपत राहिली आहे. पक्ष्यांवर घोंघावणारे संकट हे शिकारी लोकांपेक्षा विकास कामांच्या धडाक्यामुळे निर्माण झाले आहे. एकीकडे बदलणार्‍या हवामानामुळे पक्ष्यांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम झाला आहे. तसेच स्थलांतर आणि अधिवासाची विषम स्थिती ओढविली आहे. अधिक पीक घेण्याच्या आशेपोटी कीटकनाशकांचा अधिक मारा केला जात आहे. शिवाय विकासाच्या नावावर होणारी जंगलतोड, नैसर्गिक अधिवासांवर पडणारा हातोडा यामुळे पक्ष्यांच्या स्थितीत बदल पाहावयास मिळत आहे. अशी अनेक कारणे आहेत की, त्यामुळे घरासमोरचा पक्ष्यांचा किलबिलाट कमी झाला आहे.

पक्ष्यांच्या अभ्यासासाठी हजारो पक्षितज्ज्ञ आणि निसर्गप्रेमींनी जवळपास एक कोटी घटनांचे, बदलांचे आकलन करत अहवाल तयार केला आहे. यासाठी 942 प्रजातींच्या पक्ष्यांचे आकलन केले आहे. त्यापैकी 299 पक्ष्यांची खूपच कमी माहिती मिळाली. उर्वरित 643 प्रजांतींच्या आकडेवारीनुसार, 64 प्रकारचे पक्षी खूपच वेगाने कमी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याचवेळी 78 प्रकारच्या प्रजातींची संख्या कमी झाली आहे. मात्र, एका आकडेवारीनुसार, 189 प्रजातींचे पक्षी वाढतही नाहीत आणि कमीही होत नाहीत. मात्र, ते लवकरच संकटात सापडू शकतात, अशी स्थिती आहे.

या अभ्यासात रॅपटर्स म्हणजेच झडप घालून शिकार करणारे पक्षीदेखील वेगाने कमी होत आहेत. यात पावशा (हॉक बर्ड), घुबड, गरुड यांचा उल्लेख करता येईल. शिवाय सागरी किनार्‍यावर असणारे पक्षी आणि बदकांची संख्यादेखील भीषणरित्या कमी होत आहे. नदी, तलावांसारख्या भागात किनारपट्टीवर राहणार्‍या पक्ष्यांची संख्या कमी झाली आहे. मात्र, आश्चर्यकारकरित्या आशियाई कोकिळांची संख्या वाढत चालली आहे. नीलकंठ पक्ष्यासह चौदा पक्षी असे आहेत की, त्यांना 'आययूसीएन'ने लाल यादीत सामील करण्याची शिफारस केली. रेड लिस्टमध्ये लुप्त होणार्‍या प्राण्यांना किंवा पक्ष्यांना ठेवण्यात येते. जंगलातील पक्षी जसे सुतारपक्षी, पोपट, मैना, सुगरण, सातभाईच्या अनेक प्रजाती, चिपका आदींची संख्या कमी होण्यामागे घनदाट जंगलाचा अभाव हे महत्त्वाचे कारण सांगितले जात आहे. शेतात आढळून येणारे बटेर (वर्तक), गवती लाव्हा पक्षी कमी होण्यामागचे कारण म्हणजे पिकांवर कीटकनाशकांची अधिक फवारणी करणे.

समुद्र किनार्‍यावर आढळून येणारे कंठेरी चिखल्या, काळा कस्तूर, बदक यांची संख्या वेगाने कमी होत आहे. यामागचे कारण म्हणजे किनार्‍यावर, नदीकाठावर असणारे प्रदूषण, औद्योगिक घडामोडी आणि वाहतूक. ईशान्य भारतातील घनदाट जंगलातील वावरणार्‍या पक्ष्यांवर आलेले संकट तर चिंताजनकच आहे. याठिकाणी 66 पक्ष्यांच्या प्रजाती संपण्याच्या मार्गावर आहेत. भारतात इंडियन बस्टर्डची संख्या राजस्थानात सर्वाधिक आढळून येते कारण हा निर्जन, ओसाड भागातील पक्षी आहे. मात्र, वाळवंटात सिंचनाचे क्षेत्र वाढल्याने त्याचे प्रमाण कमी होत गेले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news